ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या; एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाइन कशी घेणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात येणारी शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन होणार आहे. संचालनालयाने या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे, मात्र राज्याच्या ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या पाहता ऑनलाइन परीक्षा कशी घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा 12 व 13 फेब्रुव्रारी, तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षा 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यंदा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या, त्यानुसार कला संचालनालयाने या चित्रकला परीक्षाही ऑनलाइन घेण्याचे जाहीर केले आहे.  परीक्षा ऑनलाइन झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या समस्येमुळे परीक्षा देता येईल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्याने या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. परीक्षा ऑफलाइन घेतल्या तर विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जावी अशी मागणी मागासवर्गीय विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी केली आहे, तर ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येचा फटका विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देते वेळी बसू शकतो, असे राज्य कला अध्यापक संघ महामंडळाचे सहसचिव हिरामण पाटील यांनी सांगितले.