
>> स्वरदा मंदार गोखले
शाळेमध्ये संगीत शिकवत असताना हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा असतोच. जसे शाळेत इतर विषय असतात तसा संगीत विषय असतो. वर्गातल्या प्रत्येक मुलाला-मुलीला सुरात आणि तालात गाता येतं असं नाही. हा विषय प्रत्येकालाच आवडतो असेही नाही. संगीताची साधना कशी करावी, स्वरांचा अभ्यास कसा करावा, शुद्ध स्वर अलंकारांचं संगीतामध्ये महत्त्व काय आहे, रियाज कशा पद्धतीने केला पाहिजे, आवाजाची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे हेसुद्धा शिकवणे आवश्यक आहे. मुलांना संगीताशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकवले पाहिजे. संगीत ही कला आपल्या संस्कृतीतील एक अमूल्य कला आहे. ही कला जपूया, वाढवूया.
आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीताची कीर्ती सर्वदूर जगभरात पसरलेली पाहायला मिळते. हिंदुस्थानी कलांकडे जगामध्ये अत्यंत आदराने पाहिले जाते. आपल्या देशाच्या संस्कृतीचा पाया म्हणजे, हिंदुस्थानी कला. या कलाच देशाला समृद्धी प्रदान करतात. शालेय जीवनात संगीत हा विषय कसा असावा याबाबत अनेक मतमतांतरे असू शकतात, पण आज माझे अनुभव आणि शाळेमध्ये संगीत कसे शिकवले पाहिजे याबाबत मी या लेखात विचार व्यक्त केले आहेत.
मी ज्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करते त्या शाळेमध्ये सगळ्या प्रकारची मुले येतात. निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशी ही मुलं येतात. प्रत्येकाच्या घरातलं वातावरण हे वेगवेगळे असतं. ती ज्या वातावरणात राहतात, जगतात, ज्या परिस्थितीचा त्या भाषेचा त्यांच्या जीवनावर अत्यंत सखोल असा परिणाम झालेला दिसून येतो. प्रत्येकाच्या घरामध्ये कलेला पोषक वातावरण मिळेल असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाच्या घरातील वातावरण हे वेगळंच असतं. शाळेतील मुलं खूप हुशार आहेत, पण सांस्कृतिकदृष्टय़ा आणि कलेच्या अंगाने त्यांचा विकास आणि प्रगती होण्यासाठी आपण शिक्षकांनी प्रयत्न करणं आता काळाची गरज आहे.
आपण अजून एक प्रसंग पाहूया. एकदा मी वर्गामध्ये म्हणजेच आमच्या शाळेच्या संगीत कक्षामध्ये भूप राग अत्यंत मनापासून शिकवत होते. आरोह, अवरोह शिकवले. त्यानंतर बंदिश शिकवली आणि आलाप म्हणजे काय हे समजावून सांगितलं. त्यानंतर तान म्हणजे काय हे समजावत असताना मी दोन-चार जोरदार ताना म्हणून दाखवल्या. या ताना ऐकताच मुलं खूप जोरात हसू लागली आणि मॅडम हे काय म्हणत आहेत, याचं त्यांना कुतूहल वाटायला लागलं आणि हसूसुद्धा आलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, या मुलांना कला म्हणजे काय? संगीताचा खरा अर्थ म्हणजे काय? कलेतून काय मिळतं? कलाकार होणं म्हणजे काय? कलेतून आनंद कसा घ्यावा हे माहितीच नसेल. त्यांनी कधी हे पाहिलंच नसेल किंवा ऐकलं नसेल तर त्यांना कसं कळेल? त्यांना कसा घेता येणार कलेचा आनंद? याचा विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, मुलांना शालेय संगीत शिकवताना सर्वप्रथम कला म्हणजे काय हे सांगणे फार गरजेचे आहे. ज्यांच्या अंगी कला असते, ज्याला देवाने कलेची देणगी दिली आहे त्या मुलाने किंवा मुलीने त्या कलेची कदर केली पाहिजे. ती कला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी योग्य असे मार्गदर्शन शिक्षकांनी केले पाहिजे.
सर्वप्रथम मुलांना हिंदुस्थानी संस्कृतीची संपूर्ण ओळख करून देणे आवश्यक आहे. त्यानंतर हिंदुस्थानी संगीताची परंपरा सोप्या साध्या भाषेत मुलांपर्यंत गोष्टी रूपाने, प्रसंग उभे करून, फोटोद्वारा, रेकार्ंडग ऐकून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. गायन-वादन-नृत्य यांच्या एकत्रित आविष्काराला संगीत असे म्हणतात. हे सांगताना गायन-वादन-नृत्य या तीन महान कलांचा कसा परस्पर घनिष्ठ संबंध आहे, हेही सांगितलं पाहिजे. स्वर अधिक ताल अधिक शब्द यांच्या एकत्रीकरणातून गीत कसे तयार होते, हेही प्रात्यक्षिकांसह दाखवणे, समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. स्वरात गायन कसे करावे? स्वरात गायन करणे म्हणजे काय? बेसूर होतात म्हणजे काय? तालात कसे गावे? बेताल होणे म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहेत. संगीत हा एक छंद नसून ही एक कला आहे. म्हणजेच एक साधना आहे हेही सांगणे अत्यंत आवश्यक आहे.
शाळेमध्ये संगीत शिकवत असताना हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा असतोच. जसे शाळेत इतर विषय असतात तसा संगीत विषय असतो. वर्गातल्या प्रत्येक मुलाला-मुलीला सुरात आणि तालात गाता येतं असं नाही. हा विषय प्रत्येकालाच आवडतो असेही नाही. वर्गातील 40 मुलांना एकत्र शिकवत असताना प्रत्येकाला तालासुरात गाता येईल अशी अपेक्षा करणे खरे तर चुकीचंच आहे, पण या 40 मुलांना आपली हिंदुस्थानी संस्कृती आपलं हिंदुस्थानी संगीत म्हणजे काय? कोणकोणते महान गायक संगीतकार गीतकार आपल्याकडे होऊन गेले, हे जरी कळलं तरी संगीताचा सुपीक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत सहज पोहोचेल. मुलांना संगीताचे प्राथमिक ज्ञान देताना आपल्या कलांविषयी त्यांना सांगताना त्यांच्यातील सुप्त कलांना प्रोत्साहन देणे हेही कला शिक्षकाचे काम आहे. मुलांना हे समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे की, आपली हिंदुस्थानी संस्कृती किती समृद्ध आणि संपन्न आहे. आपल्याकडे ज्या कला आहेत त्या किती उच्च दर्जाच्या आहेत आणि त्याचा आनंद घ्यायला आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे, हेही त्यांच्या मनावर बिंबवणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या मुलांचा आवाज छान आहे त्यांना गायन शिकवणे, त्यांची तयारी करून घेणे, गायन क्षेत्रात त्यांना करीअर करावे यासाठी उत्तेजन देणे, प्रोत्साहन देणे, स्पर्धांमध्ये त्यांना भाग घ्यायला लावणे हेच सगळं संगीत शिक्षकाने केलं पाहिजे. संगीताची साधना कशी करावी, स्वरांचा अभ्यास कसा करावा, शुद्ध स्वर अलंकारांचं संगीतामध्ये महत्त्व काय आहे, रियाज कशा पद्धतीने केला पाहिजे, आवाजाची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे हेसुद्धा शिकवणे आवश्यक आहे. वर्गात सर्व विद्यार्थ्यांची अभिरुची संपन्न करण्याचे काम संगीत शिक्षकांनी केले पाहिजे. संपूर्ण वर्गात एकत्रितपणे मुलांना संगीत हा विषय शिकवत असताना गीत प्रकार मुलांना ऐकवून प्रत्येक गीत प्रकाराची माहिती देणे, वाद्यांचे प्रकार सांगून त्यांची माहिती देणे, विविध प्रकारांची गाणी ऐकून दाखवणे ,ऐकवणे त्यांना म्हणायला लावणे हे सर्व संगीत शिक्षकांनी केले पाहिजे.
मुलांमध्ये आध्यात्म, निसर्ग, देवाबद्दलची श्रद्धा, भक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशप्रेम निर्माण करण्याचे काम संगीत, गायन या कलेच्या माध्यमातून होऊ शकते. आपल्या संस्कृतीमध्ये सरस्वती देवी शारदा-गणपतीची उपासना केली जाते. तसेच मातृभूमीचीसुद्धा उपासना केली जाते. याचे महत्त्व मुलांना समजावून देत असताना, सरस्वती वंदना, गणपतीची गाणी, श्लोक, विविध स्तोत्र अशा अनेक प्रकारांतून मुलांवर चांगले संस्कार करता येतात. राष्ट्रगीत, वंदे मातरम्, या प्रार्थना का म्हणाल्या हे सांगून मुलांमध्ये देशाबद्दलचे प्रेम वाढवता येते. शालेय स्तरावर लहान-लहान कार्यक्रम करून या कार्यक्रमांमध्ये मुलांना सादरीकरणासाठी उत्तेजन देता येतं.
मुलांना संगीताशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकवले पाहिजे. रेकॉर्डिंग कसे केले जाते, आपला आवाज कसा रेकॉर्ड करावा, व्हिडीओ कसा तयार करावा, कराओकेवर कशा पद्धतीने गायला पाहिजे याही सगळ्यांचं ज्ञान मुलांना देणे गरजेचे आहे. अशी अनेक गाणी, नवी गाणी माझ्या स्वराजाची दुनिया या यूटय़ूब चॅनलवर ही गाणी तुम्हाला ऐकता येतील. संगीताची आवड विकसित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. गेली अठरा वर्षे मी हेच करण्याचा प्रयत्न करते आहे. संगीत ही कला आपल्या संस्कृतीतील एक अमूल्य कला आहे. ही कला जपूया, वाढवूया आणि समृद्ध करूया. काही तानसेन बनतील तर काही कानसेन.




























































