
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला बहिणीच्या मतदारसंघातील एका निवडणूक केंद्रात विनापरवानगी घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आज रोखले. त्याच्या गाडीची तपासणी करून गाडी जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, आचारसंहिता लागू असतानाही सोनू सूद केंद्रांवर फिरून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार शिरोमणी अकाली दलाने निवडणूक आयोगाकडे केली होती.
पंजाबमध्ये आज 117 जागांवर एकाच टप्प्यात मतदान सुरू आहे. सोनूची बहीण मालविका मोगा जिह्यात काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असून तिच्या प्रसारासाठी गेले काही महिने सोनू पंजाबमध्ये तळ ठोकून होता. सोनू बहिणीच्या मतदारसंघातील निवडणूक केंद्रात विनापरवानगी घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी ही कारवाई केली. या कारवाईनंतर सोनूला आज दिवसभरात घराबाहेर पडता येणार नाही. जर त्याने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मोगाच्या न्यायदंडाधिकाऱयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते मतदारांना धमक्या देत आहेत आणि काही केंद्रांवर पैशाचे वाटप केले जात आहे, अशी माहिती मिळाल्यामुळे मतदान केंद्रांवर निःपक्षपाती होत आहे का हे बघायला जात होतो, असे स्पष्टीकरण सोनू सूद याने दिले आहे.




























































