शिक्षकाचा शाळेत दारू पिऊन गोंधळ, विद्यार्थ्यांना मारहाण करताना व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा हे विद्येचं मंदिर आहे. छत्तीसगढ येथील एका शाळेत मात्र शिक्षकाने दारू पिऊन गोंधळ घातला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना जशपुर भागातील दुलदुला विकासखंड इथल्या कस्तुरा येथील शाळेत घडली आहे. गुरुवारी एका दारुड्या शिक्षकाने मद्यपान करूनच शाळेत हजेरी लावली. शाळेतील एका वर्गात जाऊन त्याने मुलांना मस्ती करून आरडाओरडा करायला सांगितला. जेव्हा मुलांनी त्याचं म्हणणं ऐकलं नाही, तेव्हा त्याने एका एका विद्यार्थ्याला मारहाण करायला सुरुवात केली.

बराच काळ तो तसाच शाळेत फिरत होता आणि नंतर एका खोलीत जाऊन झोपला. शाळा सुटल्यावर मुलांनी या प्रकाराची घरी तक्रार केली. पालक शाळेत आले तेव्हा हा शिक्षक नशेतच होता. पालकांनी त्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला.

या व्हायरल व्हिडीओनंतर सामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली. यापूर्वीही हा शिक्षक अशा प्रकारे शाळेत दारू पिऊन आला असल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडीओनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या शिक्षकाला निलंबित केलं आहे.