मुद्दा – मराठीत बोला, मराठीच वाचा आणि मराठीतच लिहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मयूर प्रकाश ढोलम

मराठी  माणूस आणि मराठी भाषा यांचा माझ्या वाचनात आल्यानुसार कित्येक हजार वर्षांचा इतिहास आहे नव्हे इतिहासात फार मौलाचा वाटा आहे; पण आज मराठी भाषा आपल्याच मातृभूमीत महाराष्ट्रात पोरकी झाल्यासारखी झाली आहे व इंग्रजी भाषा वरचढ होऊ पाहात आहे. या सगळ्याला काही अंशी मराठी माणूसच जबाबदार आहे. मराठी माणसावर जे इंग्रजीचे भूत बसले आहे त्यांच्या हातात कायम इंग्रजी वर्तमानपत्र दिसते त्यापेक्षा जास्त दुर्भाग्य ते काय असणार. मराठी भाषेची आता ही परिस्थिती बदलायला पाहिजे. मराठी माणसाच्या हातातच नव्हे तर घराघरात मराठी वर्तमानपत्र आलेच पाहिजे आणि मराठीतच बोलणे-वाचणे-लिहिणे हे झाले पाहिजे. मराठी नाटक व सिनेमा पाहायलाही आता थोडय़ाफार प्रमाणात मराठी वर्ग दिसतो नाहीतर तिथेही हिन्दी सिनेमाला मराठी माणसाची जास्त ओढ दिसत होती. पण आता आपले मराठी चित्रपटही चांगल्या विषयावर असतात. त्यामुळे मराठी चित्रपटालाही प्रेक्षक वाढू लागले आहेत.

आता मुलांना शाळेतही घालताना मुलाचे पालक इंग्रजी माध्यमच पर्याय निवडतात. त्यामुळे कित्येक मराठी शाळांवर बंद होण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या मातृभाषेत शिक्षणही घ्यायला तयार नाही तर आपली मराठी भाषा वाढणार तरी कशी? आपण जर मुळेच कापली तर रोपाचे झाड व झाडाचे वृक्ष निर्माण कसे होणार? ती वाढणार कशी? पुढच्या पिढीची सुरुवातच जर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन होणार तर त्यांना आपल्या मातृभाषेबद्दल काय समजणार व तिचा अभिमान तरी कसा राहणार. महाविद्यालयीन मुले तर एकत्र भेटल्यावर हिन्दी-इंग्रजीशिवाय बोलायलाच तयार नसतात.  आपली पुढची पिढी शाळा व महाविद्यालयीन मुले हीच आपल्या भाषेचा पाया कमकुवत करताना दिसत आहेत. यासाठी प्रथम मराठी शाळा सुरू राहिल्या पाहिजेत. कारण मराठी शाळा राहिल्या तर मराठी भाषा राहणार. मराठी माणूस आणि संस्कृती जपली जाणार. मी शिक्षणातील कोणी फार मोठा तज्ञ नाही, पण इंग्रजी शाळेचे वाढते भूत पालकांना झपाटत आहे. याला काही अंशी आपली शिक्षण पद्धतीच जवाबदार वाटते.

समोरच्याची मुले इंग्रजी शाळेत तर माझीच का मराठी शाळेत जाणार असे पालकांचे ठाम मत आहे. त्यात अभ्यासक्रमातही बराच बदल जाणवतो. आणि आता तर अनेक वेगवेगळे पुणे – दिल्ली असे बरेच अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. आपल्या महाराष्ट्रात तरी एकच शिक्षण पद्धती सुरू झाली पाहिजे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी म्हणजे एक विषय मराठी आणि तोही महाराष्ट्राचा इतिहास मराठीतून शिकवला पाहिजे. नंतर आपली व्यवहारी भाषा हिंदी जिच्यामुळे आपण हिंदुस्थानातील विविध राज्यांतील लोकांशी बोलू शकतो. संपर्क ठेवू शकतो. म्हणजे भूगोल विषय हिंदीतून शिकू शकतो आणि नंतर आली आपली व्यापारी भाषा – परदेशी भाषा इंग्रजी जिचा वापर आपण आपल्या देशाबाहेर करू शकतो जी पहिली ते तिसरीपर्यंत शिकवू शकतो. तर काही मुले पहिलीतच शिकतात आणि त्या इंग्रजी भाषेत विज्ञान आणि गणित हे विषय शिकवले तर त्याचा शालेय मुलांना जास्त फायदा होईल. हिच शिक्षण पद्धती महाराष्ट्रातील सगळ्या शाळांत वापरली तर इंग्रजी शाळेचे वाढते प्रस्थ रोखले जाईल आणि मराठी शाळांनाही न्याय मिळेल. सगळ्या मुलांना एकच शिक्षण पद्धती शिकवल्याने सगळ्या मुलांना समान शिक्षण मिळेल आणि मग माझा मुलगा इंग्रजीत की मराठीत शिक्षण घेणार हा मुद्दाच राहणार नाही यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्रात समान शिक्षणपद्धती आणली पाहिजे.

आज आपल्या बँकेत खाते उघडायला गेले तर सगळे अर्ज, माहिती इंग्रजीत असते. एलआयसी तसेच इतर गुंतवणूक करणाऱ्या योजनाही इंग्रजीतूनच असतात आणि त्या इतक्या लहान अक्षरात असतात की धड वाचताही येत नाहीत. वैद्यकीय विमा तसेच इतर विमा योजनांचे अर्जही इंग्रजीतच असतात ते मराठीतच झाले पाहिजेत मग इतर भाषेत. अशी मराठी भाषा वाढीची सुरुवात व्हावी आणि ती होऊ शकते. अन्यथा मराठी भाषेची अशी वाईट परिस्थिती येईल की मराठी भाषा ही शाळेत फक्त एक विषय शिकवायचा म्हणून शिकवली जाईल व मुले जसे इतर विषय शिक्षण पूर्ण झाल्यावर विसरतात तसे विसरून जातील. ती संपली की आपला इतिहास – आपली संस्कृतीही संपल्यासारखीच आहे. जवळजवळ आपणच मराठी भाषा मागे पाडल्यासारखे आहे. यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया – मराठी भाषेला वाचवायची सुरुवात स्वतःपासून प्रथम करूया… मराठीत बोलणे, मराठीच वाचणे आणि मराठीतच लिहिणे ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्यासाठी इतरांना प्रवृत्त करेन.