
मेट्रो मार्गासाठी रस्ता रुंदीकरणात विस्थापित होणाऱ्या निवासी व व्यावसायिक मालमत्ताधारकांना द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईबद्दल गेल्या दोन वर्षांत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही.
त्यामुळे या मार्गावरील मेट्रोचे काम ठप्प पडले होते.
वंजारपट्टी चाविंद्रा पोगाव मार्गे टेमघर या मार्गावरून मेट्रो वळवावी असा दुसरा पर्याय पुढे आला.
परंतु तो व्यवहार नसल्याचा व अत्यंत खर्चिक असल्याचा अहवाल दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने दिला.
तसेच मेट्रो कल्याण रोडमार्गेच न्यावी, असा पर्याय सुचवला.
1,427 कोटींनी खर्च वाढणार
यापूर्वी राजीव गांधी चौक कल्याण रोड ते साईबाबा मंदिर टेमघरदरम्यानच्या नियोजित मार्गात 342 निवासी, 1 हजार 235 अनिवासी व इतर 20 अशा एकूण 1 हजार 597 मालमत्ता निष्काषित कराव्या लागणार होत्या. तेथील विस्थापितांची संख्या पाहता शेकडो कोटींची नुकसानभरपाई द्यावी लागणार होती. ती देण्यापेक्षा या मार्गावरील मेट्रो भुयारी मार्गाने न्यावी या प्रस्तावाला एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 1 हजार 427 कोटींनी वाढणार आहे.
विस्थापितांना नुकसान भरपाई द्या!
कल्याण नाका ते टेमघर मार्गावरील बांधकामे विस्थापित न करता ही मेट्रो वंजारपट्टी नाका, चाविंद्रा पोगाव येथील प्रस्तावित रिंग रोड मार्गावरील टेमघर आणि टेमघर येथून पुढे कल्याणकडे न्यावी, अशी मागणी माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी केली. तर भुयारी मार्ग बनवून प्रस्तावित खर्च वाढवण्यापेक्षा तेथील विस्थापितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कल्याण रोड व्यापारी व निवासी संघर्ष समितीचे शादाब उस्मानी यांनी केली. यासाठी लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































