
पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उतरता आलेख सुरूच असून, आज सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिह्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. तर, सातारा जिह्यात दोन रुग्ण आढळले असून, एकटय़ा नगर जिह्यात रुग्णसंख्या दुहेरी आकडय़ात असून, आज 13 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली असून, बहुतांश रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालये कोरोना रुग्णमुक्त झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण आता कमी होतानाचे दिलासादायक चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
सोलापूर जिह्यात आज एकाही रुग्णाची नोंद झाली नसून, रुग्णसंख्या दोन लाख 19 हजार 698वर स्थिर आहे. मृतांची संख्या 5231वर स्थिर आहे. तीन रुग्ण बरे झाले असून, आजवर दोन लाख 14 हजार 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मनपाहद्दीत दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण तीन रुग्ण बरे झाले असून, 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याला आज पुन्हा एकदा दिलासा मिळाला असून, गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या दोन लाख 20 हजार 327वर स्थिर आहे. मृतांची संख्याही 5911वर स्थिर आहे. एक रुग्ण बरा झाले असून, आजवर दोन लाख 14 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 17 रुग्णांवर उपचार सुरू असून, यांतील एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
सांगली जिल्ह्यात आज एकाही रुग्णाची नोंद झाली नसून, एकजण कोरोनामुक्त झाला आहे. एकूण बाधितांची संख्या दोन लाख 13 हजार 874वर स्थिर आहे. आजवर दोन लाख आठ हजार 360 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या 5509वर स्थिर आहे.
नगर जिल्ह्यात 13 कोरोनाबाधितांची भर
नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 13ने वाढ झाली असून, रुग्णसंख्या तीन लाख 94 हजार 546वर पोहोचली आहे. जिह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.05 टक्के आहे. आज 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आजवर तीन लाख 87 हजार 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.13 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून, मृतांची संख्या 7224वर स्थिर आहे. तर, जिह्याचा मृत्यूदर 1.83 टक्क्यावर स्थिर आहे. 137 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाहद्दीत एकही रुग्ण आढळला नसून, दोन रुग्ण बरे झाले आहेत.
सातारा तालुक्यात दोन रुग्णांची नोंद
सातारा जिल्ह्यात कालपासून कोरोनाच्या आणखी 2 रुग्णांची भर पडली असून, दोन्ही सातारा तालुक्यातीलच आहेत. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 लाख 80 हजार 214 पर्यंत पोहोचली आहे. जिह्याचा पॉझिटिव्हिटी दर 0.80 टक्के झाला आहे. अन्य तालुक्यात एकही रुग्ण निघालेला नाही. कालपासून एका मृत्यूची नोंद झाली असून, मृतांचा आकडा 6683 वर गेला आहे. आज एकजण कोरोनामुक्त झाला असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 71 हजार 754 इतकी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 29 आहे.



























































