नगर जिल्ह्यात ‘आरटीई’साठी 6957 अर्ज, जिल्ह्यात 400 शाळांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई-2009) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. नगर जिह्यातील ‘आरटीई’अंतर्गत नोंदणीकृत 400 शाळांमधील प्रवेशासाठी 6957 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यांतील 3058 जागा उपलब्ध आहेत.

‘आरटीई’ प्रवेशाच्या अर्जांसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अनेक शाळांना ‘आरटीई’ प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचालनालयाच्या लक्षात आले. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्याची प्रवेशाची संधी वाया जाऊ नये, यासाठी ‘आरटीई’ प्रवेशाच्या अर्जांसाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.

नगर जिह्यात ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश मिळणाऱया शाळांची संख्या 400 आहे. तेथील 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेशाच्या एकूण जागा तीन हजार 58 आहेत. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका (रेशन कार्ड), पालकांचा वाहन चालविण्याचा परवाना, वीज अथवा दूरध्वनी बिल, मिळकतकर देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. ‘आरटीई’ प्रवेशाअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया संपली असून, पुढील टप्प्यात शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी राज्यस्तरीय लॉटरीची प्रक्रिया होणार आहे.