आता दोन महिने बायो-बबल हेच घर, आयपीएल खेळाडूंना सुविधा देण्यासाठी फ्रेंचाईजींनी कंबर कसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामासाठी सर्व दहा संघ कधीच डेरेदाखल झाले आहेत. फलंदाजांच्या तळपत्या तलवारी आणि गोलंदाजांच्या मुलुखमैदानी तोफा पराक्रम गाजविण्यासाठी सज्ज आहेत. गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स या तुल्यबळ संघांमधील लढतीने आज शनिवार, 26 मार्चपासून आयपीएलच्या ‘रन’धुमाळीला प्रारंभ होणार आहे. दहा संघांमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ रंगणाऱया या स्पर्धेसाठी आता क्रिकेटपटूंसाठी बायो-बबल हेच घर असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 14 व्या हंगामाप्रमाणे काही दगाफटका होऊ नये म्हणून कडक नियमावली बनविण्यात आली आहे. मात्र खेळाडूंना बायो-बबलमध्ये असह्य वाटू नये, त्यांचे मनोबल टिकून राहावे यासाठी सर्वच फ्रेंचाईजींनी कंबर कसली आहे.

बाहेरचे खाण्यास बंदी

आयपीएलमधील क्रिकेटपटूंना आणि इतर संबंधित लोकांना बाहेरून खाण्याचे पदार्थ मागविण्याची परवानगी नाही. खेळाडूंना काही खाण्याची इच्छा झाल्यास मॅनेजरला सांगून हॉटेलमधूनच ते पदार्थ मागविले जाणार आहेत. शॉपिंगही ऑनलाइनच करावी लागणार आहे. शिवाय ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून आलेल्या वस्तू लगेच खेळाडूंना मिळणार नाहीत. त्या वस्तू सॅनिटाइज करून दोन दिवस वेगळय़ा रूममध्ये ठेवल्या जातील. त्यानंतर त्या खेळाडूंना दिल्या जाणार आहेत.

खास दिवसाची घेतली जाणार दखल

क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय यांचा जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा खास दिवसांची विशेष दखल घेतली जाणार आहे. बायो-बबलमध्ये सर्वांना घरच्या वातावरणाचा फिल यायला हवा. बायो-बबल कोणाला तुरुंगासारखे वाटू नये यासाठी फ्रेंचाईजींनी विशेष खबरदारी घेतलेली आहे.

कोरोनामुळे गतवर्षी दोन टप्प्यांत झाली आयपीएल

गतवर्षी म्हणजे आयपीएलच्या 14 व्या पर्वात कोरोनाने बायो-बबलचा फुगा फोडला होता. अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आयोजकांना नाइलाजाने आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईमध्ये घ्यावा लागला होता. यावेळी बायो-बबलचा फुगा फुटू नये म्हणून जबरदस्त तयारी करण्यात आली आहे. खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांना हॉटेलमधील बायो-बबलमध्ये घरच्यासारखे आल्हाददायक वातावरण ठेवण्यासाठी फ्रेंचाईजींनी कुठलीच कसर सोडलेली नाही. खेळाडू फक्त सरावासाठी आणि सामन्यासाठीच या हॉटेलच्या बाहेर जाऊ शकतात. मैदानदेखील बायो-बबलचाच भाग असणार आहे.

अत्याधुनिक सुविधांनी संपन्न बायो-बबल

बायो-बबलमध्ये खेळाडूंच्या मुलांसाठी किड्स झोन बनविण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या मनोरंजनासाठी टेबल टेनिस, कार्ड सेंटर, स्वीमिंग पूल, जिम, मसाज चेयर्स, पूल टेबल, म्युझिक बॅण्ड आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बायो-बबलमध्ये कंटाळवाणे वातावरण राहणार नाही यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.