
कांदिवलीच्या लालजीपाडा येथे शनिवारी घर कोसळून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अरविंद गोस्वामी या कंत्राटदाराला अटक केली आहे. तर जेसीबी चालक नीरज यादव हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कांदिवलीच्या लालजीपाडा येथील ड्रेनेज लाइन आणि रस्ता दुरुस्तीचे काम अरविंदला मिळाले होते. आठ दिवसांपासून तेथे काम सुरू होते. शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने ड्रेनेज लाइनचे काम सुरू होते. ड्रेनेज लाइनसाठी जेसीबीने खोदकाम सुरू असताना घराला तडा गेला. तडा जाऊन घराचा काही भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली काही जण अडकले होते. याची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत नौशाद अली या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर हसीना शहा आणि शाहिदुनिसा रेन या जखमी झाल्या. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अरविंद गोस्वामी या कंत्राटदाराला अटक केली. गोस्वामीला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले होते.




























































