
मोकळ्या जागेत लक्ष का घालतो अशी विचारणा करत टोळक्याने हॉटेल व्यवसायिकासह तिघांना बेदम मारहाण केली. त्याशिवाय हॉटेलमधील साहित्याची नासधूस करीत खुर्च्या आणि टेबलची तोडफोड केली. ही घटना ३० मार्चला रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील पुणे हॉटेल जंक्शनमध्ये घडली. या प्रकरणी सिद्धार्थ कांबळे (वय 28, रा. मानाजीनगर, नऱ्हे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी नारायण मंदिर परिसरात सिद्धार्थ यांचे हॉटेल आहे. दोन दिवसांपूर्वी ते हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी आलेल्या टोळक्याने त्यांना जांभळी नसरापूरमधील मोकळ्या जागेत लक्ष का घालतोस, अशी विचारणा करीत शिवीगाळ केली. त्यानंतर हॉकी स्टिकने टोळक्याने त्यांच्यावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. हॉटेलचे मॅनेजर ज्ञानेश्वर आणि शंकर यांनाही मारहाण केली. हॉटेलमधील साहित्यासह खुर्च्या आणि टेबलची तोडफोड केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर अधिक तपास करीत आहेत.
























































