
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांचे हे सर्व प्रयत्न आता फोल ठरले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सत्ता नसल्याने गुदमरत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता ‘मी पुन्हा येईन हे विसरून जावे’, असा टोलाही लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 15 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या नियोजनार्थ तसेच विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी भाषणात एकनाथ खडसेंनी जोरदार फटकेबाजी केली. अनेक चुकीच्या लोकांना हाताशी धरून भाजपकडून सरकारला पाडण्याचा प्रयत्न झाला. मला तर बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 40 वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच एकढे घाणेरडे राजकारण मी अनुभवत असल्याचे खडसे म्हणाले.
सोमय्या स्वत:च अडकले
एका वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात मी व किरीट सोमय्या एकत्र आलो. या कार्यक्रमाच्या शुटींगदरम्यान मी सोमय्यांना म्हणालो की, ‘आज तुम्ही सुपांमध्ये आहात व जे जात्यात आहेत त्यांना हसताहेत, पण केव्हा कोण सुपात जाईन आणि कोण जात्यात जाईन हे सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा’ असं सोमय्यांना सांगितल्याचे खडसे यांनी भाषणात सांगितले. आता किरीट सोमय्या हे जात्यात अडकले आहेत, म्हणजेच दुसऱ्यावर आरोप करणारे सोमय्या आता स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले असल्याचेही त्यांनी सांगितले.





























































