
नगर जिह्यात उन्हाच्या तडाख्यामुळे शेतातील कामावर व कामगारांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. यंदा एप्रिलमध्येच उन्हाचा पारा एवढा चढला आहे की शेतीकामासाठी मजूर मिळणेही दुर्मीळ होत चालले आहे. उन्हाच्या तडाख्यात सापडून राज्यात चारजणांना आपला जीव गमवावा लागल्याने आता उन्हात काम करण्यास कोणीच धजावत नसल्याचे चित्र आहे.
ऐन एप्रिलच्या मध्यवर्ती सूर्य सध्या आग ओकताना दिसत आहे. सध्या 41 ते 42 अंशापर्यंत पारा चढत असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. यातून सुटका होण्यासाठी घरात असल्यावर नागरिक फॅन, कुलर किंवा एसीचा आसरा घेत आहेत. परंतु, ग्रामीण भगात परिस्थिती वेगळी आहे. अतिउष्णतेमुळे आगास व मागास कांदा एकाचवेळी काढणीला आला आहे. त्यामुळे कांदा काढणीलादेखील मजूर मिळेनासे झाले आहेत. सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत जेवढे काम उरकेल तेवढेच काम कामगार करताना दिसत आहेत. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. ऊस कारखान्यात गाळपासाठी लवकर जावा, यासाठी शेतकरी ऊस कारखान्याच्या कर्मचाऱयांकडे चकारा मारीत आहे. जवळपास 14 ते 16 महिन्यांचा ऊस झाला आहे. ऊसाचे वजनदेखील मोठय़ा प्रमाणात घटले आहे. मात्र, पुढील पिकाकरिता रान मोकळे व्हावे म्हणून तरी आता ऊस काढणीचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. ऊसतोडणी कामगारांनादेखील उन्हाचा फटका बसत आहे. दिवसभर घाम गाळूनही उन्हामुळे अपेक्षित उसाची तोडणी करणे कामगारांसाठी अशक्य ठरत आहे.
अतिउष्णतेचा शेतीच्या कामावर मोठा परिणाम दिसून येत आहे. ग्रामीण भागात दुपारच्या वेळेस शुकशुकाट दिसून येत आहे. रानात जेथे झाडाची सावली दिसेल अशा ठिकाणी कामगार झाडांचा आश्रय घेत आहेत. मे महिन्यात यापेक्षा उन्हाचा जोर जास्त राहिला तर शेतकऱयांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
सध्या स्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. जिह्यात काही भागात विजेची मोठी समस्या निर्माण होत चालली आहे. ग्रामीण भागामध्ये 8 तास वीजपुरवठा खंडित असतो. पिके काढून झालेले शेतकरी ट्रक्टरच्या साहाय्याने जमिनीची नांगरट करत आहेत. पण अतिउन्हामुळे शेतीची जवळपास सर्वच कामे दुपारच्या वेळेस बंदच दिसत आहेत.
भारनियमनामुळे पाणी असूनही पिके करपण्याच्या मार्गावर
n सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने 44 अंशावर गेलेले तपमान, त्यामुळे अंगाची होणारी लाहीलाही आणि सर्वांत भर टाकण्याचे काम सध्या महावितरण करत आहे. ऐन उन्हाळ्यात विजेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. वीज भारनियमनाच्या नावाखाली शेतीला आठ तासांपैकी अवघा दोन ते तीन तास वीजपुरवठा होत असल्याने विहिरी व कूपनलिकांना पाणी असूनदेखील डोळ्यांदेखत पिके जळून चालली आहेत.
































































