
रिफायनरी कुठे स्थापन करायची याचा निर्णय केंद्र सरकार आणि संबंधित कंपनीला घ्यायचा आहे. महाराष्ट्राला फक्त जमीन आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
उद्योगमंत्र्यांनी आज नागपूरमधील ‘आयएएम’ला भेट दिली. मिहानच्या संचालकांसोबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी विदर्भात स्थापन करावी याकरिता पत्र दिले आहे. सुरुवातीला ही रिफायनरी कोकणातील नाणार येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिफायनरी स्थापन करणारी कंपनी विदेशी आहे. केंद्र सरकारने रिफायनरी महाराष्ट्रात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनी आणि केंद्र सरकार यांनाच जागा निश्चित करायची आहे. स्थळ निश्चितीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा आम्हाला असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
विदर्भात 10 हजार कोटीची गुंतवणूक
विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे सांगितले. यापैकी 11 उद्योग समूह प्रत्येकी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहेत. ही आकडेवारी फक्त एमआयडी क्षेत्रातील आहे. त्याशिवाय यवतमाळ जिह्यात प्रसिद्द ऑस्ट्रेलियन कंपनी ‘सितारा‘सोबत ऊर्जा निर्मितीचा करार झाला आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भात मोठय़ा प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल असेही देसाई यांनी सांगितले.



























































