
सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. काळाने बोट धरून आपल्याला यंत्रयुग, तंत्रयुग, अणूयुग, अवकाशयुगात फिरवून आणले. आता आपण भ्रमयुगात वावरत आहोत. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित, संमोहित झाला आहे. त्याची वाचा हरवली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि दडपण त्याच्या जगण्याला वेढून राहिले आहे. आपला भवताल साहित्यिकाला टिपता आला पाहिजे. किंबहुना या भवतालावर त्याने निर्भयपणे सत्य सांगण्याचे धारिष्ट्य केलेच पाहिजे, असे परखड भाष्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
सध्याचा काळ, मराठी साहित्याचा हरविलेला चेहरा, साहित्याच्या अभिरूचीला मारक ठरू पाहणारा तुच्छतावाद, संविधानाला अनुसरून देश घडविला गेला आहे का, सर्वसामान्य माणसाला खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत का, बुध्दीवादाची होत असलेली टिंगल, विभाजनवाद अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा भारत सासणे यांनी आपल्या भाषणात परामर्श घेतला.
आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहराच हरवून गेला आहे, अशी खंत व्यक्त करतानाच त्यांनी मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काही करूणा वाटते का असा सवालही केला. सत्याचा आग्रह धरणे, सत्याचा उच्चार करणे हे जसे आज गरजेचे आहे त्याचप्रमाणे सत्य निर्भयपणे सांगितले गेले पाहिजे ही देखील काळाची गरज त्यांनी बोलून दाखवली. समाजात विभाजनवादी अनर्थकारी, उत्तेजना वाढविणारा खेळ मांडला जात आहे. सिनेमा तुमचा आणि आमचा असे सांगून कला विभाजित केली जात आहे. तर दुसरीकडे सरस्वतीचे उपासक दु:खी होत आहेत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चालली आहे. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे; सर्वत्र चतुर मौन पसरले आहे, असे मत भारत सासणे यांनी आज व्यक्त केले.
साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबाबत आस्था वाटली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबीत होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे हे पाहिले पाहिजे. त्याला पुन्हा एकदा साहित्यात प्रस्थापित करावे लागेल असे भारत सासणे म्हणाले. साहित्याच्या परिघात सध्या निर्माण झालेल्या तुच्छतावादाचाही भारत सासणे यांनी चांगलाच समाचार घेतला. यामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरूचीचा अपमान होत असल्याचे ते म्हणाले.
मराठी साहित्यातून अद्भुतरस हद्दपार!
मराठी साहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेले, निरस असे झाल्याचे दिसते आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या यांना कुलूपबंद तळघरात ढकलून दिले आहे. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे अशी खंत भारत सासणे यांनी व्यक्त केली.
साहित्याअंतर्गत भाषेचे काही प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. संविधानाला अभिप्रेत असलेला देश घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांर्गत या घटनेचे पडसाद बहुदा पडलेले नाहीत अशी टीकाही भारत सासणे यांनी केली.
विभाजनवादी छद्मबुद्धीचे समाजावर नियंत्रण!
सध्या समाजावर विभाजनवादी छद्मबुद्धीचे नियंत्रण आहे. हे विध्वंसक आपल्या पुढील पिढीच्या मुलांच्या हातात कोणता भिकेचा कटोरा देणार आहेत, याचा फक्त अंदाजच करता येतो. पण नांदी तर झालेलीच आहे. आपण थाळी वाजविली आणि ती वाजविताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजविण्याचे भीषण संदर्भ खरेतर राज्यकत्र्यांनासुद्धा माहिती नाहीत असा टोला सासणे यांनी लगावला.
हा तर मॅडनेस
एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असे काहीसे कुणीतरी म्हणते आहे. लेखकाला मात्र यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाही तर विचारपूर्वक केलेले चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही ते धर्मही नाहीत असेलच तर पंथ आहेत असेही कुणीतरी म्हणतो आहे. हे सर्व ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत. लेखक मात्र व्याख्या इत्यादीच्या घोटाळ्यात पडत नाही. त्याला बगलेमध्ये लपविलेली सुरी नेमकी दिसत आहे असे भारत सासणे म्हणाले.
तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणे त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपाय देखील नाही. आशावादी असणे ही त्याची अपरिहार्यता देखील आहे. आशावादी असणे या व्यतिरिक्त तो दुसरे काय करू शकतो असे खडे बोल सुनावून भारत सासणे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.




























































