बहुप्रतीक्षित सातारा मेडिकल कॉलेज अखेर सुरू, इमारतीचे बांधकाम सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतीक्षित सातारा मेडिकल कॉलेजचा अखेर प्रारंभ झाला आहे. कॉलेजमध्ये पहिल्या बॅचचे शिक्षणही सुरू झाले आहे. त्यामुळे आता कॉलेजच्या इमारतीचे काम कधी सुरू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इमारती बांधण्यासाठी 450 कोटींचा निधी मंजूर असून, यासाठी नुकतीच बैठक झाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात इमारतीचे हे टेंडर खुले होणार आहे.

सातारा मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षीच्या बॅचची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, शिक्षणही सुरू झाले आहे. एक जागा रिक्त असून, ही जागा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे. मेडिकल कॉलेजची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॉलेजच्या इमारतीकडे लक्ष लागून राहिले आहे. या कामासाठी ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापि कोणीही निविदा भरलेली नाही. देशातून अनेक कंपन्या या निविदाप्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबत इच्छुक असलेल्या 11 कंपन्यांची निविदापूर्ण बैठक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांसोबत ऑनलाइन झाली. त्यामध्ये काही सोयी-सुविधा, बदल, आराखडा याविषयी चर्चा झाली. या शंकांचे निरसन बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी केले आहे.

मेडिकल कॉलेजच्या निविदा प्रक्रियेत अहमदाबाद (गुजरात), चेन्नई, दिल्ली, महाराष्ट्रातील दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे हे टेंडर मिळविण्यासाठी केंद्र व राज्यपातळीवरून ताकद लागण्याची शक्यता आहे. अद्यापि कोणीही निविदा भरलेली नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ऑनलाइन टेंडर खुले होईल. त्यानंतरच प्रत्यक्ष आणखी किती कंपन्या सहभागी झाल्या, हे समजणार आहे. त्यानंतर बोली व इतर बाबी होतील. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यास जून महिना उजाडेल. कमी किमतीच्या निविदेला मान्यता देऊन कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या निविदाप्रक्रियेवर विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे चांगले काम करणाऱया कंपनीलाच संधी मिळण्याची शक्यता आहे.