पानपट्टीवर विडी मिळते तशी ईडीची अवस्था, उदयनराजे भोसले यांचा भाजपला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींत ईडीच्या भूमिकेवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळय़ांना. एखाद्या गोष्टीसाठी सारखे ईडीला कामाला लावायचे म्हणजे काय चेष्टा झाली आहे का, पानपट्टीवर बिडी मिळते तशी ईडीची अवस्था झाली आहे, असा घरचा आहेर उदयनराजे यांनी भाजपला दिला.

उदयनराजे म्हणाले राज्यातले राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे, माझा आवडता शो ‘टॉम ऍण्ड जेरी’ आहे, पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे आणि ज्या माकडउडय़ा चालल्या आहेत त्या बघत बसतोय. ईडीचा ससेमिरा मागे लावून एखाद्याला दीड-दोन वर्षे जेलमध्ये टाकायचे, वर त्याने काही केले नाही म्हणायचे. लोकांना डोळे नाहीत का, लोकांना मेंदू नाही, लोक या राजकीय तमाशाला हसत आहेत, असेही ते म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीची गरज नाही

राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करा, असा कांगावा करणाऱया विरोधकांनाही उदयनराजे यांनी जोरदार चपराक दिली आहे. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मग झाले. त्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज नाही असे ते म्हणाले.