
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्डसाठी मेसर्स अर्नेस्ट अॅण्ड यंग एलएलपी या पंपनीला सल्लागार म्हणून निवडले आहे. यासंदर्भात 27 एप्रिल रोजी बैठक झाल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्डच्या ऑटोमेटीक फेअर कलेक्शन सिस्टमसाठीच्या तांत्रिक बाबीचा तपशील, आर्थिक मॉडेल आणि टेंडर व्यवस्थापन आदी कामांसाठी या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.
प्राथमिक योजनेप्रमाणे सर्व रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर कार्ड रिडर बसविण्यात येणार असून प्रवाशांनी कार्ड टॅप करताच गंतव्य स्थानकानुसार त्याचे तिकीट तयार होऊन पैसे आपोआप कार्डातून वळते करण्याची योजना आहे. तसेच तिकीट तपासनीसांच्या हातात तिकीट तपासण्याची हॅण्डहेल्ड मशीन पुरविण्यात येणार आहे. येत्या आर्थिक वर्षाअखेर हे कॉमन कार्ड सुरू होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.


























































