
जुनं ते सोनं असं म्हणतात. वास्तविक ही म्हण जुन्या वस्तुंच्या टिकाऊपणासाठी आणि उपयुक्ततेसाठी वापरली जाते. पण, एखाद्या माणसाच्या बाबतीत ही म्हण खरी ठरली तर?
एका सुदैवी माणसाच्या बाबतीत ही म्हण शब्दशः खरी ठरली आहे. ही घटना जर्मनीमध्ये घडली आहे. जर्मनीतील एका माणसाने किचन कॅबिनेट खरेदी केलं होतं. त्यात त्याला खजिना गवसला आहे.
या माणसाचं नाव थॉमस हेलर असं असून तो सोशल हाऊसिंग वर्करचं काम करतो. त्याने थॉमसने इबे या वेबसाईटवरून एका वृद्ध जोडप्याकडून किचन कॅबिनेट खरेदी केलं होतं. मूळ 300 युरो किंमत असलेलं ते कॅबिनेट त्याला 203 युरो म्हणजेच 16 हजार 359 रुपयांना पडलं होतं.
ते कॅबिनेट घरी आणल्यावर त्याने ते साफ करण्यासाठी उघडलं. तेव्हा त्याच्यात त्याला दोन पाकिटं आढळली. त्यात त्याला सुमारे 1 लाख 30 युरो इतकं चलन आढळलं. त्याचं किंमत 1 कोटी 24 लाख 68 हजार 591 रुपये इतकी होते. त्याने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. ही रक्कम एका नर्सची असून ती 91 वर्षांची आहे. तिच्या नातवाने हे कॅबिनेट विकलं होतं. त्याला याबाबत काहीही माहिती नव्हती.



























































