दखल – रंगभूमीचा दस्तऐवज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रशांत गौतम

मराठवाडय़ातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश साळुंके यांचा ‘मराठवाडय़ाची नाटय़परंपरा’ हा मौलिक ग्रंथ संभाजीनगरच्या कैलास पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केला. या ग्रंथात लेखक साळुंके यांनी विस्ताराने सविस्तर आढावा घेतला आहे, ज्याचा उल्लेख अ.भा. मराठी नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी आपल्या ‘मराठवाडय़ाच्या नाटय़लेखकांचे महाभारत’ या शीर्षकाच्या प्रस्तावनेत केलेला आहे.

या मौलिक ग्रंथात एकूण अकरा प्रकरणे असून, ग्रंथात टिपणे, परिशिष्ट, संदर्भसूची आणि छायाचित्र या विभागातून वाचकांना महत्त्वाची माहिती मिळते. मराठवाडा स्थलनाम, मराठवाडय़ाच्या नाटय़परंपरेचे उगमस्थान: प्राचीन व मध्ययुगीन, मराठवाडय़ाच्या नाटय़परंपरेचे उगमस्थान: लोकरंगभूमी, मराठवाडय़ाची अभिजात रंगभूमी मराठवाडय़ाची नाटय़परंपरा: मेळा, मराठवाडय़ाच्या नाटय़परंपरेचे उगमस्थान: 1960 पर्यंत- अ) मराठवाडय़ातील शतायुषी रंगभूमी, ब) मराठवाडय़ाची रंगभूमी 1960 पर्यंत असा चार प्रकरणांपर्यंत आढावा लेखक घेतात. ‘मराठवाडय़ाची रंगभूमी 1961 ते 2020’ या कालखंडात मराठवाडय़ाच्या रंगभूमीचे विविध प्रवाह नमूद करतात. ‘जिल्हानिहाय’ या भागात संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशीव, बीड, लातूर येथील नाटय़ चळवळीविषयी लिहितात. एवढेच नाही, तर हे विविध प्रवाह स्पष्ट करीत असताना नाटय़लेखन, शैक्षणिक, बाल कामगार, दलित रंगभूमी या प्रवाहांविषयी लिहितात. पडद्यामागची रंगभूमी याही विषयावर लेखक प्रकाश टाकतात. मराठवाडय़ातील नाटय़गृह, आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार या महत्त्वपूर्ण कार्यांचा आढावा घेतात.

‘आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार, रंगसंवाद’ या विभागात प्रा.कमलाकर सोनटक्के, प्रा. वामन केंद्रे, प्रा. दत्ता भगत, प्राचार्य रा.रं. बोराडे, शिवदास घोडके, प्रा. विभाकर मिरजकर, विजय दिवाण, प्रा. दिलीप घाटे, मकरंद अनासपुरे, गणेश चंदनशिवे यांच्या अभ्यासपूर्ण मुलाखती आहेत, तर दुसऱ्या भागात डॉ. शंकरलाल पुरवार, पु. घ. हौजवाला, माया दातार, प्रा. त्र्यंबक महाजन, प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे, प्रा. कुमार देशमुख, प्रा. यशवंत देशमुख, विश्वास साळुंके, प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, प्रा. शशिकांत बऱहाणपूरकर या जुन्या, नव्या, रंगभूमीच्या नाटय़ प्रवासावर आधारित लेख आहे आणि बाल, कामगार, दलित, हौशी, लोकरंगभूमीच्या स्वतंत्र प्रकरणात त्या-त्या क्षेत्रातील उल्लेख आहेत. प्रत्येक जिल्हय़ाचा आढावा घेत असतानाच लेखक मराठवाडय़ाच्या समग्र रंगभूमीचा, रंगकर्मींचा उल्लेख करतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘मराठवाडय़ाची शतायुषी रंगभूमी’ हे महत्त्वाचे प्रकरण आहे. मागच्या पिढीने दिडेकशे वर्षांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कष्ट घेत मराठवाडय़ाची रंगभूमी जिवंत ठेवली आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी या उदात्त हेतूने डॉ. सतीश साळुंके यांनी ‘मराठवाडय़ाची नाटय़परंपरा’ हा मौलिक गंथ लिहून त्याचा ऐतिहासिक दस्ताऐवज नव्या पिढीच्या हाती सोपवला आहे.

मराठवाडय़ाची नाटय़परंपरा
लेखक: डॉ. सतीश साळुंके
प्रकाशक: कैलास पब्लिकेशन, संभाजीनगर
पृष्ठ: 960, मूल्य: रुपये 1200/-