
देशभरात निवडणूक रणनीतीकार म्हणून ख्याती असणारे प्रशांत किशोर यांनी आता स्वतःचा नवा पक्ष काढण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशांत किशोर यांनी ‘जनतेमध्ये जाण्याची वेळ आली आहे. याची सुरुवात बिहारमधून होईल’, असं सूचक ट्विट करत राजकारणातील आपल्या नव्या इनिंगचे संकेत दिले आहेत.
काँग्रेससोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर प्रशांत किशोर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर निवडणूक रणनीती आखत आहेत. आधी भाजप, नंतर काँग्रेस, मग जेडीयू आणि विविध राजकीय पक्षांसाठी निवडणुकीची रणनीती बनवणारे प्रशांत किशोर आता इतरांसाठी रणनीती बनवणार नाहीत, तर ते स्वतःच्या पक्षासाठी रणनीती बनवतील. एकाचवेळी देशभरात त्यांचा पक्षाचे काम सुरू होईल, अशी चर्चा आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर दोन दिवसांच्या पाटणा दौऱयावर आले आहेत. पाटणा येथे ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत आणि इतर पक्षांच्या काही प्रमुख नेत्यांनाही भेटणार आहेत. प्रशांत किशोर पाटणा येथून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबद्दल मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशांत किशोर यांचा पक्ष पूर्णपणे आधुनिक, डिजिटल असेल आणि जनसंपर्क करण्याच्या नवीन प्रगत तंत्रज्ञानासह लॉन्च केला जाईल. अद्याप त्यांच्या पक्षाचे नाव ठरले नसले तरी पुढील एक-दोन वर्षांत त्यांचा पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
‘जन सुराज’च्या मार्गावर वाटचाल
लोकशाहीत प्रभावी योगदान देण्याची भूक आणि लोकांप्रति कृती धोरणे तयार करण्यासाठीच्या प्रवासात खूप चढ-उतार झाला आहे. आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा खऱया मालकांमध्ये जाण्याची वेळ आली आहे, म्हणजेच लोकांमध्ये, जेणेकरून त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊन ‘जन सुराज’च्या मार्गावर वाटचाल करता येईल, असं प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

























































