
धूम्रपानाचे व्यसन एकदा जडले की, ते सहजासहजी सुटत नाही. ग्लोबल अडल्ट टोबॅकोने (जीएटीएस) केलेल्या सर्व्हेनुसार, तंबाखूचे सेवन करणे ही अगदी सामान्य बाब असून हिंदुस्थानात 267 दशलक्ष व्यक्तींना तंबाखूचे व्यसन आहे. तंबाखू सेवनामुळे लोकांना फक्त हृदय, श्वसनसंस्थेवर परिणाम होतात एवढेच माहित असते, पण तंबाखूच्या व्यसनामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होऊ शकते.
धूम्रपान आणि दृष्टी जाण्याची कारणे याबाबत तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई रेटिना सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्हणाले की, ”धूम्रपानामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते तसेच डोळ्यांचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याचा आणि यामुळे डोळ्यांना त्रास होण्याचा धोका वाढू शकतो. हे तीन आजार म्हणजे एएमडी, मोतीबिंदू आणि काचबिंदू. एएमडी रुग्णांमध्ये धूम्रपानामुळे रेटिनाला ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते आणि मॅक्युलामधून ल्युटीन कमी होते.”
धूम्रपानाचा डोळ्यांवर परिणाम होण्याची कारणे
– धूम्रपानामुळे व्यक्तींमध्ये वयोमानापरत्वे मॅक्युलर डिजरेशन होण्याचा धोका वाढतो, ज्यामध्ये अत्यंत बारीक वस्तू पाहण्यास मदत करणाऱ्या मॅक्युलाची (रेटिनाचा मध्यभाग) स्थिती जास्तच बिकट होते. याचा प्रत्यक्ष दृष्टीवर परिणाम होतो आणि अंधुक दिसणे, विकृती आणि दृष्टीच्या मध्यभागी ब्लाइण्ड स्पॉट्स अशी लक्षणे दिसून येतात. तंबाखू डोळ्यातील पडद्यामधील रक्तप्रवाहात व्यत्यय आणते आणि त्यामुळे मॅक्युलर डिजनरेशन होते. धूम्रपानामुळे होणाऱ्या ऑक्सिडेशनचा मॅक्युला पेशींवरही परिणाम होतो.
– एएमडी होण्याचा धोका कमी करण्याचा मार्ग म्हणजे धूम्रपान न करणे, रेटिनल आजारांमुळे दृष्टी कमी झाल्यास त्यावर उपचार होऊ शकत नाही, पण वेळेवर निदान केले तर रेटिनल आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते. धूम्रपान करणा-यांना धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत एएमडी होण्याची तीन ते चार पट शक्यता असते. धूम्रपान करणाऱ्यांसोबत राहणारे धूम्रपान न करणाऱ्यांना एएमडी होण्याचा दुप्पट धोका असतो. अशावेळी पुरेशी काळजी घेतली नाही, तर कायमस्वरुपी अंधत्व येऊ शकते.
– तंबाखूच्या धुराचा डोळ्यांभोवती असलेल्या उतींवरदेखील परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पापण्यांचा विकार होऊ शकतो आणि डोळ्यांखाली सूज येऊ शकते, असे पुण्यातील इनसाइट व्हिजन फाऊंडेशन येथील वैद्यकीय संचालक डॉ. नितीन प्रभुदेसाई म्हणाले.
डायबेटिक रेटिनोपॅथी
धूम्रपानामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहींनी धूम्रपान केल्या या आजारातील जटिलता अधिकच वाढते. सिगारेट्समधील रसायनांचा शरीरातील पेशींवर घातक परिणाम होतो आणि जळजळ होते. तसेच निकोटिनमुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमध्ये वाढ होण्यासोबत त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड झाल्याने पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. मधुमेही व्यक्तींना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिनच्या उच्च डोसेसची गरज लागते. यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते, असेही डॉ. प्रभुदेसाई पुढे म्हणाले.
मोतीबिंदू
मोतीबिंदू हे जगभरात अंधत्वाचे प्रमुख कारण आहे, जे डोळ्यातील नैसर्गिक पारदर्शक लेन्स अंधुक करते. असे निदर्शनास आले आहे की, धूम्रपान केल्याने ऑक्सिडेशनद्वारे लेन्समध्ये पेशी बदलू शकतात. तसेच, यामुळे लेन्समध्ये कॅडमियमसारखे हानीकारक धातूदेखील जमा होऊ शकतात. यामुळे दृष्टी धूसर होते यावर उपचार न केल्यास त्यावर सूज येते आणि डोळ्यात इतर जटिलता निर्माण होतात.
काय करावे ?
– याबाबत डॉ. दुदानी यांनी सांगितले की, डायबेटिक रेटिनोपॅथी असलेल्या रुग्णांनी धूम्रपान टाळावे, कारण भविष्यात जटिलतांमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे रक्तवाहिन्या व डोळ्यांमधील मज्जातंतू अधिक खालावण्याचा धोका निर्माण होतो. पूर्वी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धूम्रपान कधीच न केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त धोका असतो, कारण काही नुकसान अगोदरच झालेले असते. उपचाराचे काटेकोरपणे पालन, नियमितपणे डोळ्यांची तपासणी आणि धूम्रपान सोडणे हे डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रमुख घटक
दृष्टी कमी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी काय करावे
– धूम्रपान सोडा.
– नियमितपणे डोळ्यांची तपासणी करा आणि उपचारांचे काटेकोरपणे पालन करा
– आरोग्यदायी आहार सेवन करा (हिरव्या पालेभाज्या, फळे आणि जीवनसत्त्व क, ई व बीटा कॅराटिनचे उच्च प्रमाण असलेले खाद्यपदार्थ)
– रक्तदाब व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा
– सक्रिय राहा
– नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या आणि डोळ्यांशी संबंधित समस्या टाळण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी डोळ्यांचे आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करावी. डोळ्यांच्या लेन्सवर विषारी घटक जमा होऊ शकतात आणि नियमित तपासणी करूनच डोळ्यांना होणारे नुकसान टाळता येऊ शकते.



























































