कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावरील मडके वस्तीजवळ घडली आहे. कैष्णकी संतोष सरवदे (कय 23, रा. अंबिकानगर, बाळे, सोलापूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

वैष्णवी ही कॉलेजमधून घरी निघाली होती. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मडके वस्तीनजीक मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने तिच्या दुचाकीला धडक देत दुचाकीसह वैष्णवीला फरफटत नेले. या घटनेनंतर कंटेनरचालक पळून जात असताना नागरिकांनी पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

कॉलेजमधील काम संपवून वैष्णवी पाच वाजण्याच्या सुमारास हसत-खेळत निरोप घेऊन कॉलेजमधून घरी निघाली. मात्र, एक तासाने तिच्या मृत्यूची माहिती मिळताच, कॉलेजमधील मैत्रिणींना धक्का बसला. ‘आई कॉलेजमधील काम संपले आहे. मी घरी निघाले आहे, असे फोनवरून सांगून वैष्णवी घरी निघाली होती. मात्र, तिने आईला केलेला फोन कॉल शेवटचा ठरला. वैष्णवीची वाट पाहत असतानाच तिचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजल्याने आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता.

ट्रकच्या धडकेत महिला ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून घरी जेवण्यासाठी निघालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहोळ-कुरूल रस्त्यावर शुक्रवारी दुपारी घडली आहे. ज्योत्स्ना नागनाथ सोनवणे (वय 35, रा. नागराज नगर, मोहोळ) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेचा भाऊ प्रवीण नागनाथ सोनावणे यांनी फिर्याद दिली आहे.