अतिरिक्त उसाची जबाबदारी शेजारच्या कारखान्यांवर, नगर जिह्यातील गळीत हंगाम 6 जूनपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांत वातावरणाची बदलती परिस्थिती पाहाता जिह्याच्या उत्तर भागातील राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या तीन तालुक्यांतील अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी आदी ठिकाणी उसाचे प्रमाण कमी आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक दोन लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस आहे. यापैकी एक लाख 40 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. या ठिकाणी 80 हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारील कारखान्यांवर विभागून दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या साखर आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीमधील बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, 6 जूनपर्यंत गळीत हंगाम बंद करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

जिह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 30 एप्रिल रोजी खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष लोकप्रतिनिधी आणि शेतकऱयांनी वेधले होते. त्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱयांना अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, साखर प्रादेशिक संचालक मिलिंद भालेराव, लेखापरीक्षण अधिकारी संतोष पवार आदींच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिह्यात 14 सहकारी आणि नऊ खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. जिह्यात एक कोटी 73 लाख 30 हजार 13 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. एक कोटी 73 लाख 49 हजार 828 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी उतारा 10.1 टक्के आहे. जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या उसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरा) यांनी 30 हजार मेट्रिक टन, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (संगमनेर) यांनी 25 हजार मेट्रिक टन, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी 25 मेट्रिक टन उसाचे गाळप करावे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरा) यांना 30 हजार मेट्रिक टन, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (संगमनेर) यांना 25 हजार मेट्रिक टन, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांना 25 मेट्रिक टन उसाचे गाळप करावे लागणार आहे. उसाचे गाळप सुरू झाल्यानंतर 6 जूनपर्यंत गळीत हंगाम सुरू राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

हार्वेस्टर आणून ऊसतोडणी करण्याचे निर्देश

सध्या उन्हाळ्यामुळे ऊसतोडणी मजूर उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक कारखान्याने गाळप बंद झालेल्या साखर कारखान्यांकडील हार्वेस्टर आणून उसाची तोडणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ज्या कारखान्याच्या क्षेत्रात जादा ऊस आहे. त्यांनी 6 जूनपर्यंत गळीत हंगाम बंद करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

चार कारखान्यांचा गाळप हंगाम संपला

जिह्याच्या दक्षिण भागात उसाचे क्षेत्र कमी आहे. साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी झालेले आणि बिगर नोंदणी झालेल्या उसाचे गाळप केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अशा चार कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. त्यामध्ये क्रांती शुगर, जय श्रीराम, राहुरी हे कारखाने बंद झाले आहेत. कुकडी, श्रीगोंदे, पीयूष, अंबालिका आणि यूटेक या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप पूर्ण होत आले आहे.