
सांगली येथील ऑफिसर्स क्लबमधील जलतरण तलावात पोहत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने पाण्यात बुडून शासकीय कॉन्ट्रक्टर सचिन नवले (वय 47) यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.
सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील आमराई उद्यानाशेजारी प्रतिष्ठत ऑफिसर्स क्लब आहे. या क्लबमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नामांकित वकील, इंजिनियर्स, कॉन्ट्रक्टर्स व्यापारी, उद्योजक यांच्यासह उच्चभ्रू व्यक्ती सदस्य आहेत. सर्वजण या क्लबमध्ये जिम, स्विमिंग, योगा करण्यासाठी पहाटेच्या सुमारास येत असतात. महापालिकेचे कॉन्ट्रक्टर सचिन नवले हेदेखील नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी याठिकाणी आले होते.
ऑफिसर्स क्लबच्या पहिल्या मजल्यावर असणाऱया स्विमिंग टँकमध्ये ते पोहत होते. पोहत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सकाळच्या सुमारास सदरचा प्रकार कोणाच्याही निदर्शनास आला नाही. काही कळायच्या आत नवले पाण्यामध्ये बुडाले. नवले बाहेर न आल्याने क्लबच्या कर्मचाऱयांनी शोधाशोध केली असता ते पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले.
यावेळी त्यांच्या तोंडाला फेस आला होता. यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले. नवले यांचे मेहुणे संजय पाटील यांनी सव्वाअकराच्या सुमारास त्यांना सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.


























































