खाणं आणि बरंच काही वर्षाची बेगमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

आजही अनेक घरांमध्ये ही वाळवण संस्कृती जोपासली जात आहे. जिथे शक्य आहे तिथे शेजारपाजारच्या बायका एकत्र येऊन हे करतात. त्या निमित्ताने त्यांच्या सुख-दुःखाची देवाणघेवाण होते, स्नेहबंध अधिक घट्ट होतात. घरात केलेले पापड बाहेर नेऊन वाळत घालणे, पाखरांपासून त्यांचे रक्षण करणे, वाळल्यावर सामान घरात गोळा करून आणणे हे करताना घरातील मुलांची मदत घ्यावीच लागते. थोडक्यात काय तर सगळे घर या कामाने एकत्र येते. ‘एकमेकां साह्य करू’ ही उक्ती प्रत्यक्षात येते आणि घरादारावर भरउन्हाळ्यात मायेची शाल पांघरली जाते.

पूर्वीच्या काळी उन्हाळा आला की घरोघरीच्या गृहिणींची धांदल उडून जायची. मुलांच्या परीक्षा, सुट्टय़ा याचे दडपण घेण्याचा तो काळ नव्हता. मुले त्यांचा त्यांचा अभ्यास करत आणि सुट्टीत एकत्र येऊन धुडगूसही घालत. आयांची गडबड चाले ती बेगमीचे पदार्थ बनवण्यासाठी. हल्ली सर्रास बाहेर जाऊन खाणे-पिणे चालते. बाहेर जाणे शक्य नसेल तर बाहेरून आपल्याला हवे ते पदार्थ घरात आणून देणारे स्वीगी, झोमॅटो, डंझो इ. जिनी तयारच असतात. त्यामुळे घरात काही भरीचे पदार्थ असायला हवेत अशी असोशी कमी झालेली दिसते. अर्थात तरीही अजून कित्येक घरात या भरीच्या म्हणजेच बेगमीच्या पदार्थांची परंपरा टिकून आहे. उन्हाळा आला की, गृहिणीचे बेत चालू होतात. या वर्षी काय काय बनवायचे, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे याची यादी तिच्या डोक्यात पक्की असते. अहोंना आवडणारे उडदाचे पापड, घरातील ज्येष्ठांसाठी साबुदाण्याच्या पापडय़ा, बटाटय़ाचा कीस असे उपासाचे पदार्थ, तर मुलांसाठी साखरांबा, गुळांबा इत्यादि. तोंडाला चव आणणारे वर्षाचे लोणचे मात्र पहिला पाऊस पडून गेला की. ते एकदा बरणीत गेले की, या वाळवणं प्रकाराची इतिश्री होते म्हणा ना!
हे सगळे पदार्थ सर्वसाधारणपणे वर्षभरासाठी करून ठेवले जातात. त्यामुळे घरी कधी आयत्या वेळी कोणी पाहुणे आले आणि घरात भाजी नसली तरी वेळ निभावून नेता येते. घरात काही शुभ कार्य निघाले की, काही वेळच्या भाज्यांचा प्रश्न मिटतो आणि खर्चात बचत होते. अगदी महागाईच्या वेळेलाही हे पदार्थ उपयोगी पडतात.

या वाळवणाची सुरुवात होते ती सांडगे घालून. विदर्भ-मराठवाडय़ात शुभकार्याचा मुहूर्तही सांडगे घालूनच होतो. निरनिराळ्या डाळी एकत्र करून बनवलेले हे सांडगे अत्यंत पौष्टिक असतात. ते तळूनही खाता येतात आणि त्याची भाजीही खूप छान बनते. मात्र सहसा वाळवण म्हटलं की, डोळ्यासमोर चित्र येतं ते कुरडया, पापडय़ा यांचे. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात याचे निरनिराळे प्रकार आढळतात. कुरडया बनवताना त्यासाठी लागणारे गहू तीन दिवस भिजवणे, पाणी बदलत राहणे, चौथ्या दिवशी ते वाटणे, साका गोळा करणे आणि दुसऱया दिवशी पहाटे ते सत्त्व शिजवून चिक बनवणे हा एक मोठा सोहळाच असतो. चिक शिजवण्यावर गृहिणीचा सुगरणपणा पूर्वी मोजला जायचा. स्वच्छ पांढऱया कुरडया झाल्या आणि तळल्यावर त्या फुलून आल्या की, गृहिणीचा चेहराही समाधानाने फुलून येतो. काही ठिकाणी हे सोपस्कार टाळण्यासाठी रव्याच्या कुरडयाही केल्या जातात, पण भाव खाऊन जातात त्या अर्थातच गव्हाच्या कुरडया! याचा चीक नुसता तेल-मीठ घालून खातात, दूध-साखर घालूनही कित्येकांना आवडतो. बरं, हा काही वर्षभर मिळणारा पदार्थ नाही, शिवाय एरवी सहज वाटलं म्हणून खायला केला इतका सोपाही नाही. त्यामुळे याचे महत्त्व आगळेच!

पापड या प्रकारातील वैविध्य अचंबित करणारे आहे. निरनिराळ्या प्रकारचे पापड बनवले जातात. उडीद, मूग, मटकी, पोहे, नाचणी, तांदूळ, ज्वारी, बटाटा, साबुदाणा आणि कितीतरी. त्यातही पुन्हा लाल तिखट, हिरवी मिरची, जिरे, ओवा, लवंग-दालचिनी असे वेगवेगळे पदार्थ घालून चवीतही वैविध्य आणले जाते. पापडाच्या लाटय़ा खाणे हा मुलांच्याच नव्हे तर मोठय़ांच्या देखील आनंदाचा भाग असतो. गच्चीत किंवा अंगणात वाळत घातलेले पापड मोठय़ांचा डोळा चुकवून अर्धेओले असताना खाणे हा तर मुलांचा हक्कच असतो.

केवळ कुरडया, पापडच नाही तर काही ठिकाणी गवार, गाजर, मेथी यांसारख्या भाज्याही खारवून वाळवून ठेवल्या जातात. जेव्हा बाजारातील भाज्यांचे प्रमाण कमी होते, काही काही भाज्या मिळेनाशाच होतात तेव्हा या वाळवलेल्या भाज्या उपयोगाला येतात. हल्लीच्या काळात या अशा भाज्या भरपूर पैसे मोजून हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे फळे वाळवून किंवा पाकात मुरवून ठेवली जातात.

कित्येक सुगृहिणी हात शेवयादेखील करतात. हे सगळे प्रकार देशावर केले जात असले तरी कोकणातही बेगमी होतेच, तिथले पदार्थ थोडे वेगळे असतात एवढेच! तिथे यांच्या जोडीला आंबा पोळी, फणस पोळी, फणसाचे गरे, आमसुले, कैऱया-आवळे-काजू यांचे पदार्थही केले जातात. वर्षभराचे मसाले, तिखट, लोणची, सांडगी मिरच्या, मिरगुंड, इ. प्रकारही याच काळात केले जातात. वाळवणाचे अजूनही कित्येक प्रकार आहेत. लहानपणी या काळात केलेल्या गमतीजमतींनी अनेकांचे बालपण समृद्ध केले आहे.

आजही अनेक घरांमध्ये ही वाळवण संस्कृती जोपासली जात आहे. जिथे शक्य आहे तिथे शेजारपाजारच्या बायका एकत्र येऊन हे करतात. त्या निमित्ताने त्यांच्या सुख-दुःखाची देवाणघेवाण होते, स्नेहबंध अधिक घट्ट होतात. घरात केलेले पापड बाहेर नेऊन वाळत घालणे, पाखरांपासून त्यांचे रक्षण करणे, वाळल्यावर सामान घरात गोळा करून आणणे हे करताना घरातील मुलांची मदत घ्यावीच लागते. थोडक्यात काय तर सगळे घर या कामाने एकत्र येते. ‘एकमेकां साह्य करू’ ही उक्ती प्रत्यक्षात येते आणि घरादारावर भरउन्हाळ्यात मायेची शाल पांघरली जाते. ही मायेची परंपरा अशीच पुढे न्यायला हवी. त्याने ‘मस्त खा आणि स्वस्थ राहा’ हे अमलात आणता येईल.
(लेखिका अनुवादक आणि समतोल
या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत.)
n [email protected]