आता दिल्ली दूर नाही… राजधानी लवकरच ‘वंदेभारत रेक’द्वारे धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बरोबर पन्नास वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पश्चिम रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास मुंबई सेंट्रल टर्मिनसहून नऊ कोचसह सुरू झाला होता. आज राजधानीच्या 50 वा वाढदिवस केक कापून व पोस्टाच्या खास टपालाचे अनावरण करीत साजरा करण्यात आला. गेल्या पन्नास वर्षांत ‘राजधानी एक्स्प्रेस’नी अनेक रूपे बदलत प्रवाशांना विविध सोयी व सुविधा वाढवित आपला आब आजही राखून ठेवला आहे. गेल्याच वर्षी राजधानी ‘तेजस’च्या अत्याधुनिक रेकमध्ये परिवर्तित झाली. आता हा मार्ग काही वर्षांत दर ताशी 160 कि.मी.च्या क्षमतेचा झाल्यानंतर राजधानी सेमी हायस्पीड ‘वंदेभारत’ रेकद्वारे चालविण्यात येणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी.व्ही.एल.सत्यकुमार यांनी आज केली.

देशाची आर्थिक राजधानी आणि राजकीय राजधानीच्या दोन महानगरांना जोडणार्‍या पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसचा 17 मे 1972 रोजी नऊ डब्यांच्या आधारे प्रवास सुरू केला होता. त्यावेळी राजधानीमुळे दरवर्षाला साडे चार कोटीचे उत्पन्न मिळत होते. तेव्हा दिल्ली गाठायला 19 तास लागायचे आता 15 तास 32 मिनिटे लागत असून आता वर्षाला 100 कोटींचे उत्पन्न मिळते अशी माहिती यावेळी सत्यकुमार यांनी दिली. 2003 नंतर राजधानीला लाल रंगाचे ‘एलएचबी’ डबे जोडण्यात आले. 2017 मध्ये एचओजी तंत्रज्ञान वापरण्यात आले. तर 2021 मध्ये ‘तेजस’ रेकमध्ये तिचे परीवर्तन करण्यात आले आता पुढच्या टप्प्यात तेजसच्या जागी ट्रेन सेट ‘वंदेभारत’चा रेक तिला लावण्यात येईल. त्यासाठी हा मार्ग दर ताशी 160 कि.मी. क्षमतेचा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्वदीच्या कमरूझ यांचा राजधानीवर विश्वास…
राजधानीने 40 वर्षांचा असताना मी प्रथम प्रवास केला होता. रेल्वेने प्रवाशांना चांगली सुविधा दिली आहे. माझी आय साईट थोडी विक झाली आहे. त्यामुळे गेले दोन वर्षे मी प्रवास केला नाही. आता राजधानीवर विश्वास असल्याने मी कामानिमित्त पुन्हा दिल्लीला जात आहे. माझ्या डोळ्यांची तपासणीही अमृतसरला करायची असल्याचे मस्जिद बंदरचे रहिवासी कमरूज झमान (वय 89) यांनी सांगितले. तर आपले वडील आजही चार मजल्याच्या इमारतीचे जिने चढतात व उतरतात, जे मलाही आज शक्य नसल्याचे मासे निर्यातीचा व्यवसाय करणार्‍या त्यांच्या मुलाने सांगितले.

राजधानीची चेन पुलींग झाली..
राजधानी तिच्या वेळेवर निघतेच असा तिचा लौकीक असताना फलाटावरून निघतानाच बी-2 डब्यांतून कोणीतरी चेन पुलींग केल्याने ट्रेन पुन्हा जागीच थांबली. आरपीएफ येईपर्यंत सुरक्षा साखळी खेचणारा प्रवाशाला सोडायला आलेला नातेवाईक पळूनही गेला. राजधानीने पन्नास वर्षांपूर्वी प्रवास केलेल्या रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थित चीफ पोस्ट मास्तर जनरल वीणा सुर्यवंशी, वाणिज्य व्यवस्थापक अशोक मेहता व डीआरएम सत्यकुमार यांच्या हस्ते पोस्टाच्या विशेष पाकीटाचे अनावरण करण्यात आले.