
राधानगरी अभयारण्य क्षेत्रात भेकर या वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी सावर्धन (ता. राधानगरी) येथील तिघांना वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱयांनी रंगेहाथ पकडले.
कोंडीबा तुकाराम डवर, राजेंद्र भरत पाटील, ओंकार बळवंत पत्ताडे (सर्व रा. सावर्धन) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील, वनपाल एस. व्ही. कांबळे, वनरक्षक ए. डी. कुंभार. एम. आर. वंजारे, वनमजूर बळवंत राठोड, मारुती पाटील हे पथक गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार सावर्धन येथील हडक्याचा माळ नावाने ओळखल्या जाणाऱया ठिकाणी भेकर या वन्यप्राण्याची शिकार करून मांसाचे वाटे घालत असताना या तीन संशयितांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यात मुद्देमालासह शिकारीमध्ये वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे, तर आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील तपास करीत आहेत.
या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात घनदाट जंगल असून, अनेक वन्यजीवांचे वास्तव्य या भागामध्ये आहे. राधानगरी तालुक्यामध्ये अभयारण्य क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात चोरटय़ा शिकारी होत असल्याची चर्चा आहे. मात्र, याची वाच्यता होत नसल्याने बहुतांशी प्रकरणे उघडकीस येत नाहीत. याकरिता वन विभागाने या गोष्टीकडे बारकाईने लक्ष घालणे महत्त्वाचे आहे, असे मत निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.



























































