सुप्रिमो चषकावर यंदा कोण कोरणार नाव, 16 नामवंत क्रिकेट संघांत रंगले महाक्रिकेट युद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील 16 नामवंत टेनिस क्रिकेट संघांत रंगलेल्या नवव्या सुप्रिमो चषकाच्या विजेत्या संघाची मुंबईसह देशभरातील क्रिकेटशौकिनांना प्रतीक्षा लागली आहे. सुप्रिमोचा झळाळता चांदीचा चषक कोण पटकावणार याचा फैसला लवकरच होणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीडब्ल्यूजे डॉमिनेटर्स (पालघर), अँजेल स्पोर्टस् (कोलकाता), ट्रायडन्ट उमर इलेवन (नवी मुंबई) आणि पंधारी किंग (मुंबई) या चार संघांनी मजल मारली आहे. महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आणि कलिना विधानसभेचे शिवसेना आमदार-विभागप्रमुख संजय पोतनीस यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली नववी सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धा रंगतदार ठरली आहे. आता अंतिम पर्वात प्रवेश करणाऱया या स्पर्धेच्या विजेत्याच्या नावाची प्रतीक्षा क्रिकेटशौकीन करीत आहेत.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 2010 पासून सुरू झालेल्या सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेची लोकप्रियता केवळ देशातच नव्हे, तर 22 देशांत पोचली आहे. अतिशय देखणे आणि हायटेक संयोजन. प्रेक्षकांचा तुफानी जल्लोष आणि मराठी, मालवणी, हिंदी, इंग्रजी भाषेत होणारे स्पर्धेचे सुमधुर आणि माहितीपूर्ण समालोचन ही या स्पर्धेची खास वैशिष्टय़े ठरत आहेत.

शुद्ध चांदीचा चषक
z यंदा विजेत्या संघाला शुद्ध 99 टक्के चांदी आणि ग्रॅफाइट यांच्या संयुगातून बनवलेला झळाळता रौप्यचषक बहाल करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर इटालियन तंत्राने 8 हीटिंग प्रक्रियेतून गेलेल्या भव्य चषकावर 99 टक्के चांदीचा मुलामा देण्यात आलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या चषकाची झळाळी आणि चमक कायम टिकून राहणार आहे. या चषकाची जडणघडणही आंतरराष्ट्रीय तंत्राने केल्याचे संयोजक संजय पोतनीस यांनी स्पष्ट केले. विजेत्या संघाला रोख 9 लाख रुपये, उपविजेत्या संघाला रोख 7 लाख रुपये आणि चषक अशा भव्य रोख पारितोषिकांचा महावर्षाव सहभागी क्रिकेटपटूंवर होईल. मालिकावीरास मारुती कार, सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला मोटारबाईक आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाला मोटारबाईक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेला शनिवारी नामवंत संगीतकार अन्नू मलिक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुप्रिमोचे संयोजक आमदार संजय पोतनीस यांनी मलिक यांचा शाल, सन्माचिन्ह व श्रीफळ देऊन विशेष सन्मान केला. माजी टेनिस क्रिकेट प्रशासक बाबा रॉड्रीग्ज यावेळी उपस्थित होते.