भाजप प्रवक्त्या नूपुर शर्माविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका इंग्रजी वृत्तवाहिनीत डिबेट शोच्या चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर याच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्माविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रझा अकादमीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर रझा अकादमीने मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे याना पत्र लिहून नूपुर शर्माविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

हिंदुस्थानात ज्ञानव्यापी प्रकरण सध्या चर्चेचा विषय आहे. नुकताच एका वृत्तवाहिनीवर ‘ज्ञानव्यापी फाइल’ हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात नूपुर शर्मा यांच्या सह चार जण सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान नूपुर यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्या आक्षेपार्ह व्यक्तव्याची क्लिप रझा अकादमीच्या पदाधिकाऱयाला मिळाली. धार्मिक भावना दुखावल्याने रझा अकादमीच्या पदाधिकाऱयाने पायधुनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पायधुनी पोलिसांनी नूपुरविरोधात भादंवि कलम ‘295 अ’ (धार्मिक भावना दुखावणे), ‘153 अ’ आणि ‘505 ब’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायधुनी पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.