
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत यंदाच्यावर्षी सोलापूरने पुणे विभागात अव्वलस्थान मिळविले असून, जिह्याचा निकाल 94.15 टक्के लागला आहे. सोलापुरात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
सोलापूर जिह्यातून 54 हजार 792 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. यामध्ये 22 हजार 870 मुलींपैकी 21 हजार 850 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 31 हजार 922 मुलांपैकी 29 हजार 443 मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिह्यातील मुलांची सरासरी 96.11 टक्के, तर मुलांची 92.75 टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण आहे.
नगर जिह्याचा 94 टक्के निकाल
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज दुपारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. नगर जिह्याचा 94.41 टक्के निकाल लागला आहे. नगर जिह्यात यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने बारावीची परीक्षा यंदा ऑफलाइन पद्धतीने झाली होती. त्यामुळे या निकालाची सर्वांनाच उत्सुकता होती. आज दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. पुणे विभागाचा 93.61 टक्के निकाल लागला असून, नगर जिह्याचा 94.41 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मुलांची टक्केवारी ही 92.72 टक्के असून, मुलींची 96.73 टक्के आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिह्यातून 63 हजार 667 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये 36 हजार 711 विद्यार्थी व 26 हजार 956 विद्यार्थिनींची नोंदणी होती. यापैकी 36 हजार 407 विद्यार्थी व 26 हजार 597 विद्यार्थिनी असे एकूण 63 हजार 4 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. या विद्यार्थ्यांपैकी 59 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 33 हजार 757 विद्यार्थीनी, तर 25 हजार 729 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय निकाल
अकोले 93.87, जामखेड 97.51, कर्जत 95.67, कोपरगाव 89.03, नगर 96.92, नेवासा 95.51, पारनेर 97.88, पाथर्डी 95.55, राहाता 93.83, राहुरी 90.24, संगमनेर 94.03, शेवगाव 98.57, श्रीगोंदा 92.33, श्रीरामपूर 86.76.




























































