
वीज मीटर रीडिंगमध्ये गोलमाल करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणने चांगलाच दणका दिला आहे. मीटर रीडिंगच्या कामात कुचराई करणाऱ्या, प्रत्यक्ष रीडिंग न घेता अवाच्या सवा रीडिंग नोंदवणाऱ्या तब्बल 47 रीडिंग घेणाऱ्या एजन्सी गेल्या चार महिन्यांत बडतर्फ केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या असून महसुलात वाढ झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.
महावितरणचे राज्यभरात दोन कोटी 60 लाखांहून अधिक वीज ग्राहक असून त्यापैकी लघुदाब वर्गवारीतील सुमारे 2 कोटी 15 लाख ग्राहकांना प्रत्येक महिन्याला वीज बिल द्यावे लागते. त्यासाठी खासगी एजन्सींच्या विभागनिहाय नेमणुका केल्या आहेत. मात्र सदरच्या मीटर रीडिंग एजन्सी हेतुपुरस्सर चुका करत आहेत, तसेच व अचूक रीडिंग नोंदवण्यात हयगय केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीपासून महावितरणने कामात कुचराई करणाऱया मीटर एजन्सींविरोधात धडक कारवाई सुरू केली होती. त्यानुसार आतापर्यंत 47 एजन्सी बडतर्फ केल्या आहेत.



























































