
सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील पाच महापालिका क्षेत्रातून अकरावी ऑनलाइन प्रवेशाची नोंदणी सुरू असून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून अर्जाचा भाग-1 भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नसून केंद्रीय शिक्षण मंडळांचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहे.
मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी प्रवेशाला सुरुवात केली असून केंद्रीय बोर्डांचा बारावीचा निकाल जाहीर होण्याआधीच प्रथम वर्ष प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. मात्र शालेय शिक्षण विभाग मात्र अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय बोर्डांचा दहावीचा निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय बोर्डाचे विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर नोंदणी करून अर्जाचा भाग-1 व कॉलेज पसंतीक्रम भरण्यासाठी अर्जाचा भाग-2 भरू शकतील. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनादेखील याचदरम्यान कॉलेज पसंतीक्रम भरता येतील.
अकरावी प्रवेशात आयसीएसईचे विद्यार्थी अधिक
अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत सीबीएसईपेक्षा आयसीएसईचे विद्यार्थी अधिक आहेत. गेल्या वर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये संपुष्टात आली होती. ज्या महाविद्यालयांचे प्रवेश पूर्ण झाले होते त्यांना अकरावीचे वर्ग घेण्यास परवानगी मिळाली होती. गेल्या वर्षी मुंबई विभागात आयसीएसईचे आठ हजार तर सीबीएसईच्या पाच हजार विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला होता. या दोन्ही बोर्डाचे दहावीचे निकाल जुलैमध्ये लागण्याची शक्यता आहे.


























































