…आणि संत निवृत्तीनाथ समाधिस्थ झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नामदेव सदावर्ते

संत सद्गुरू निवृत्तीनाथ शके 1219 ज्येष्ठ कृष्ण 13 या तिथीस समाधिस्थ झाले. निवृत्तीनाथांचे शिष्य व लहान बंधू संत ज्ञानेश्वर यांना आळंदी येथे समाधिस्थ करून समाधी विवराची शिळा लावल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे लहान बंधू सोपानदेव सासवड येथे, नंतर चांगदेव पुण्यस्तंभ येथे समाधिस्थ झाले. शेवटी तापी नदीतीरावर मुक्ताई गुप्त झाली. असे अनेक आघात सहन करणारे योगिराज निवृत्तीनाथ खूप दुःखी झाले. त्यानंतर त्यांचेही चित्त सैरभैर झाले होते.

सद्गुरू निवृत्तीनाथांचे शिष्य व लहान बंधू संत ज्ञानेश्वर यांना आळंदी येथे समाधिस्थ करून समाधी विवराची शिळा लावल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे लहान बंधू सोपानदेव सासवड येथे, नंतर चांगदेव पुण्यस्तंभ येथे समाधिस्थ झाले. शेवटी तापी नदीतीरावर मुक्ताई गुप्त झाली. असे अनेक आघात सहन करणारे योगिराज निवृत्तीनाथ खूप दुःखी झाले व ते देवास म्हणाले, हे देवा, अगदी सहज ज्ञानदेवादिंना या भवपाशातून आपण मुक्त केले. माझा ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे सारे समाधिस्थ सुखी झाले. त्याने माझे चित्त सैरभैर झाले आहे. हे देवा, आपण आता त्र्यंबकेश्वरी चला. आता माझे प्राण कंठासी आले.

संत सद्गुरू निवृत्तीनाथांचे हे बोलणे ऐकून भगवंत विमानात बसले. निवृत्तीनाथांना जवळ घेतले. राहि-रुखमाई व सुरगण विमानात बसले. गंधर्व व सुरगणांची विमाने निघाली. निवृत्तीनाथ देवाला म्हणाले, हे देवा, आपण प्रथम सप्तशृंगी जाऊन देवीचे दर्शन घेऊ. तेथे साधू-संत भेटतील. नामदेवराय म्हणतात-

नामा म्हणे धन्य तुझ्या योगे हरी ।
तीर्थयात्रा सारी घडली आम्हां ।।

पुढील प्रकरणात निवृत्तीनाथ समाधी सोहळा नामदेवांनी अभंगबद्ध केला आहे. टाळ-मृदंगासह अभंग गायन करून निवृत्तीनाथांचे मन स्थिर व शांत करण्याचा सारे जण प्रयत्न करीत होते. काही मुनिजन गीतार्थ सांगू लागले. त्याने निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांची अधिकच आठवण येऊ लागली. ज्ञानराजाने बुद्धिज्ञानाचा अपूर्व खेळ करून विश्व सुखरूप केले.

शोकव्याप्त मनाने निवृत्तीनाथ म्हणतात- हे देवा, माझ्या आधी या जगातून माझ्या लहान भावंडांचे जाणे खूप दुःख देणारे आहे. सर्वात जास्त मला दुःखी केले ते मुक्ताईने. निवृत्तीनाथांचे हे बोलणे ऐकून सर्वांची मने दुःखाने व्याकुळ झाली. भावंडांच्या आठवणी सांगत सर्व समुदायासह देव, निवृत्तीनाथांची विमाने सप्तशृंगाजवळ उतरली. नामदेव म्हणतात-

देवी देवेश शिवी शिवेश ।
अगम्य सुरस आदिमाया ।।
अष्टदिशा अगोचरे ।
अष्टदशभुजा संहारकारे ।।
असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीयें ।।

देवी मातेची स्तुतीस्तवने करीत सर्वांनी मंदिरात येऊन देवीची पूजा केली. अंबामातेपुढे कीर्तन झाले. निवृत्ती नारायण कीर्तनास बसले. भगवंतांनी पूजासाहित्यासह संतांची पूजा केली. निवृत्तीनाथांनी विठ्ठलाची पूजा केली. सर्वत्र समाधी परिसरात पताका उभारल्या. अनादी समाधीची शिळा दूर करून द्वार उघडले. नामदेवराय म्हणतात –

पश्चिमेसी स्थळ अनादी समूळ ।
उघडिली शिळा समाधीची ।।
म्हणती योगिश्वर अनादी या शेजा ।
चिद्रत्ने ती पूजा केली असे ।।

हे समाधी स्थळ अनादी असून, अनेक युगापासून येथे धुनी पेटलेली आहे. तुळशी, बेलपत्रे, पुष्पे वाहून ऋषीश्वरांनी पूजा केली. नामदेवाच्या चारही मुलांनी समाधी स्थळ स्वच्छ केले. बेलपत्री, फुले अंथरून समाधी सुशोभित केली.

सभोवती दीप लाविले समाधी ।
म्हणती पूजा आधी केली असे ।।
अनादी हे पूजा केली म्हणती संत ।
आता कोणी आत उतरू नये ।।
नामा म्हणे हरी स्थळ हे चांगले ।
दुर्वा दर्भ फुले वाहियेली ।।

निवृत्तीराज त्र्यंबकेश्वरी समाधीजवळ आले. समाधीभोवती कुंकुमाचे सडे टाकले. निवृत्तीरायांनी नमन सुरू केले. धूप, पंचारतीनंतर अक्षता वाहून देवांनी निवृत्तीराजाचे पूजन करून त्यास आशीर्वाद दिले. सर्वांच्या डोळय़ांत प्रेमाश्रू आले. पुंडलिकाने निवृत्तीनाथांच्या गळय़ात पुष्पमाळा घातली. निवृत्तीनाथांनी लिहिलेला ग्रंथ पुढे ठेवण्यात आला. निवृत्तीनाथांनी सर्वांना नमस्कार केला.

नामा म्हणे देवा निवृत्तीसारखा योगी ।
नाही आता जगी दावावया ।।

समाधीजवळ सगळे बसले. निवृत्तीसंगे दोन्ही बाजूस पुंडलिक व पांडुरंग समाधी विवरात गेले. सर्वांना वंदन केल्यानंतर निवृत्तीनाथांना देवाने आणि पुंडलिकाने समाधी आसनावर बसविले. नामदेव दुःखी मनाने म्हणाले, हे देवा, काय पाहावे आता! सूर्य अस्ताला गेला. हे देवा, निवृत्ती हे सूर्य होते. ज्ञानसूर्य होते. नामदेवराय म्हणतात-

निवृत्तीराज बैसले समाधी सुचित्त ।
चिन्मय ते ज्योत उजळली ।।
पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळां ।
अवघियांच्या डोळा आसुवें येती ।।
विठोबाचे हृदय आलेसे भरून ।
झांकियेले नयन निवृत्तीराजे ।।
पुंडलिके आणिले विठोबासी बाहेर ।
केला नमस्कार वैष्णवांनी ।।
राही रुखमाई बैसल्या गहिंवरत ।
आणिक संत महंत वोसंडिती ।।
नामा म्हणे हरि शुद्धी नाही सकळां ।
घाला आता शिळा समाधीसी ।।
नामदेवांचे पुत्र दुःखी झाले. त्यांनी समाधीची शिळा
झाकली. शके 1219 ज्येष्ठ कृष्ण 13 या तिथीस निवृत्तीनाथ समाधिस्थ झाले.