
कसोटी क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडवर 3-0 फरकाने निर्भेळ यश मिळविल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने आता टीम इंडियालाही इशारा दिला आहे. न्यूझीलंडला जसे हरवले तसेच तुम्हालाही हरवू, अशी बोलंदाजी करून त्याने दौऱयावर आलेल्या हिंदुस्थानला डिवचले आहे. हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान 1 ते 5 जुलैदरम्यान एकमेव कसोटी सामना रंगणार आहे.
2021 मध्ये उभय संघांमध्ये सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थानी ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शेवटचा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. ही कसोटी आता 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळवली जाणार आहे. या तुल्यबळ लढतीपूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडय़ांवर सरस खेळ करीत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आता आमच्या रडारवर टीम इंडिया आहे. त्यांना हरवून नक्कीच आम्ही मालिका बरोबरीत सोडवू,’ असा निर्धारही त्याने व्यक्त केला.




























































