
लहान मुलींना बार्बी डॉलचे विशेष आकर्षण असते. बार्बी म्हणजे मुलींची खास मैत्रीणच जणू. अनेकजणींच्या संग्रहात बार्बी आणि तिच्या आठवणी असतात. पण बॉर्बी म्हटलं की फक्त गोऱ्या वर्णाची आणि पाश्चिमात्य प्रभावाची डॉल समोर येते. याच समजुतींना छेद देण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून हिंदुस्थानी बार्बी आपल्या भेटीला सज्ज झाली आहे. यूटय़ूबवर आणि एका ब्युटी ब्रँडच्या संस्थापक सीईओ दीपिका मुटियाला यांनी ही कमाल केली आहे. हिंदुस्थानी वर्ण, कानात झुमके आणि बांगडय़ा घातलेली देशी डॉल दीपिका यांनी सादर केली आहे.
दीपिका मुटियाला यांनी बार्बी डॉल बनवणाऱ्या मॅट्टेल कंपनीसोबत भागीदारी करत हिंदुस्थानी बार्बीला जगासमोर आणले आहे. दीपिका यांनी सोशल मीडियावरून ‘दक्षिण आशिया अमेरिकन बार्बी’चे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये लाल सूटमध्ये दिसणाऱ्या बार्बीने गुलाबी टीशर्ट परिधान केला आहे. तिच्या त्वचेचा रंग ‘टिन्टेड’ आहे. हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवणारे आभूषण तिने घातले आहेत.
या पोस्टमध्ये वर्णाबद्दलचे स्टिरिओटाईप मोडण्याचा प्रयत्न दीपिका यांनी केला आहे. रंगाबद्दल मुलींच्या मनामध्ये न्यूनगंड दिसून येतो. ही बार्बी सर्व मुलींना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांच्या रंगात कन्फर्टेबल वाटण्यास आणि त्यांचे अस्तित्व कायम ठेवायला मदत करेल, असा विश्वास दीपिका यांनी व्यक्त केला.
जगावर प्रभाव पाडणार
या पोस्टला कॅप्शन लिहिताना दीपिका यांनी लिहिलंय, 2022 च्या बार्बीला भेटा! तिची त्वचा टिन्टेड आहे. तिचे डोळे मोठे आहेत आणि भुवया ठसठशीत आहेत. ती तिच्या पॉवर सूटसह झुमके आणि बांगडय़ा घालते. ही हिंदुस्थानी बार्बी सांस्कृतिक पुंपण ओलांडणारी, महत्त्वाकांक्षी, समंजस आणि प्रेमळ आहे. ती निर्भीड आहे. जगावर प्रभाव पाडणारी सीईओ अशी आमची नवीन बार्बी आहे.
नेटिजन्सकडून कौतुकाचा वर्षाव
हिंदुस्थानी बार्बी डॉलचे फोटो बघून नेटिजन्सनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक जणींनी बार्बी स्वतःसारखी दिसत असल्याच्या कमेंट केल्या. दीपिका या यशस्वी यूटय़ूबर आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

























































