
राहुल मालिकेस मुकणार, जाडेजाही पहिल्या सामन्यात नाही
एकदिवसीय क्रिकेट मालिकेत वेस्ट इंडीजचा 3-0 फरकाने सुपडा साफ करणारा हिंदुस्थानी संघ उद्यापासून यजमान संघाविरुद्ध पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ करणार आहे. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला या मालिकेपूर्वी धक्का बसलाय. कारण सलामीवीर लोकेश राहुल अद्याप दुखापतीतून सावरलेला नसल्याने तो या मालिकेस मुकणार आहे. शिवाय अष्टपैलू रवींद्र जाडेजाही अनफिट असल्याने उद्याच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाहीये.
लोकेश राहुल जर्मनीत उपचार घेऊन मायदेशी परतला, पण त्यानंतर त्याला कोरोनाने गाठले. त्यामुळे आता तो विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राहुलपाठोपाठ रवींद्र जाडेजाही पहिल्या ट्वेण्टी-20 सामन्यात खेळू शकणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी खेळवला गेला होता. या सामन्यात त्याला संधी दिली नव्हती.



























































