ठसा – डॉ. नंदा खरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून डॉ. नंदा खरे ओळखले जातात. मराठी साहित्यातील विवेकवादी साहित्यिक म्हणून त्यांची ओळख. ‘अंताजीची बखर’, ‘उद्या’, ‘बखर अंतकाळाची’ या त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय झाल्या. मानवाच्या जडणघडणीचा साद्यंत अभ्यास करून त्यांनी सिद्ध केलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला आहे. नंदा खरे यांनी वृत्तपत्रीय लेखनही विपुल प्रमाणात केले आहे.

वैचारिक भूमिकेशी ठाम राहून कोणतीही तडजोड न करता लेखन करणारा साहित्यिक अशीच त्यांची ख्याती होती. नंदा खरे यांनी मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा सूक्ष्म तपशिलानिशी व तेवढय़ाच तटस्थपणे अवलोकन करीत समाजातील विषमता आणि अज्ञानाच्या विरोधात प्रदीर्घ लेखन केले. साहित्य आणि विज्ञानाची अशक्य वाटणारी सांगड घालत त्यांनी साहित्यातले बहुस्तरीय पदर वाचकांपुढे उघड केले. नंदा खरे मूळ नागपूरचे. शिवाजी नगरातील त्यांच्या घरी जसा कायम लेखकांचा राबता असायचा तसाच तरुण विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीचेही ते पेंद्र होते. ‘सत्य दाबून ठेवण्याचा प्रकार सर्व काळात कमी-जास्त प्रमाणात सुरूच असतो. प्रत्येक वेळी कुणीतरी खरे बोलण्याची गरज असते. जोपर्यंत सत्य बोलत राहण्याची गरज आहे, तोपर्यंत मी लिहीत राहणार आहे,’ अशी भावना ते सातत्याने व्यक्त करीत. या भावनेला अनुसरूनच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कृती केली.

अनंत यशवंत ऊर्फ नंदा खरे हे मूळ नाव. व्यवसायाने ते स्थापत्य अभियंता. त्यांची व्यावसायिक कारकीर्द यशस्वी राहिली. त्यांनी जसे महाराष्ट्रातील अनेक वीज प्रकल्प, धरणे, पूल, कारखाने उभारण्यास मदत केली तसेच आपल्या लिखाणातून समाजाला वैचारिक नेतृत्वही प्रदान केले. खऱयांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा 1961 साली उत्तीर्ण झाल्यानंतर 1962-67 या काळात त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण घेतले. 2001 सालापर्यंत एका खासगी कंपनीत ते स्थापत्य अभियंता होते. शैली आणि आशयाच्या दृष्टीने ‘अंताजीची बखर’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. त्याशिवाय वीसशे पन्नास, वारुळपुराण, कहाणी मानवप्राण्याची, जीवोत्पत्ती आणि नंतर, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य, ज्ञाताच्या पुंपणावरून यांसह इतर अनेक पुस्तके प्रकाशित झाली. ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ या त्यांच्या आत्मचरित्राचीदेखील वाचकांनी मोठय़ा उत्सुकतेने दखल घेतली. 1993 ते 2017 दरम्यान त्यांनी ‘आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. 1984 ते 1991 या कालखंडात खरे यांनी मराठी विज्ञान परिषदेला सहकार्य केले.

2020 साली खरे यांच्या ‘उद्या’ या गाजलेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता, परंतु त्यांनी हा पुरस्कार नाकारला. त्यावेळी खरेंच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली होती. राजकीय कारणातून त्यांनी हा निर्णय घेतला का? याबाबतही मोठी चर्चा रंगली होती, परंतु नंतर खरे यांनीच याबाबत खुलासा केला होता. माझ्या या निर्णयामागे कुठलेही राजकीय कारण नाही. समाजाकडून भरपूर मिळाले आहे आणि यापुढेही काही स्वीकारत राहणे मला इष्ट वाटत नाही. त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ‘ज्ञाताच्या पुंपणावरून’ या हस्तलिखितास 1985 साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यासाठीचा द्वितीय पुरस्कार, ‘वीसशे पन्नास’ या विज्ञान कादंबरीस 1995 साली विदर्भ साहित्य संघाचा गो. रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार, ‘कहाणी मानवप्राण्याची’ या मानवशास्त्र्ाविषयक ग्रंथास 2010 साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अॅकेडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार, एकूण कादंबरी लेखनासाठी 2014 साली ‘शब्दः द बुक गॅलरी’ या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार, ‘उद्या’ या कादंबरीला 2015 साली लोकमंगल साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. माणसाच्या रोजच्या जीवनमरणाची निरीक्षणे टिपून त्यातली आर्तता त्यांनी अतिशय कौशल्याने लेखणातून व्यक्त केली आहे.