
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह खंडणीप्रकरणी निलंबित असलेले पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांचे निलंबन शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले आहे. गृह विभागाने त्याबाबतचा अध्यादेश काढला आहे.
खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांना सेवेतून निलंबित केले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी नेमली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झालेल्या मणेरे यांच्यावर कल्याण आणि कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असल्याने पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यावरदेखील निलंबनाची कारवाई केली होती; पण शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने डीसीपी मणेरे यांचे निलंबन रद्द केले आहे. निलंबन रद्द करण्याचा अध्यादेश गृह विभागाने काढला आहे. या अध्यादेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


























































