बिहारमध्ये बाजार उठणार, नितीश कुमार कमळाबाईंशी घटस्फोट घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये भाजपचा बाजार उठणार असून जदयूचे अध्यक्ष, मुख्यमंत्री नितीशकुमार कमळाबाईंशी घटस्फोट घेणार आहेत. येत्या दोन दिवसांतच जदयू-भाजप युती तुटण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काँग्रेससोबत नवे सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. तसेच राजद आणि डावे पक्ष यांच्याशीही बोलणी सुरू आहे. पाटणामध्ये जदयू आमदार आणि खासदारांशी बैठक बोलविण्यात आली आहे. दरम्यान, बिहारमधील या सत्ताबदलाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील सत्ता जाणे भाजपासाठी मोठा झटका आहे.

बिहारमध्ये 2020च्या विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजप युतीने एकत्र निवडणूक लढविली. भाजपपेक्षा कमी जागा जदयूला मिळाल्या तरी नितीशकुमार मुख्यमंत्री बनले. येथेच नाराजी नाटय़ सुरू झाले आणि दिवसेंदिवस ही घुसफूस वाढत गेली. मुख्यमंत्रीपदावर असूनही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची सतत ढवळाढवळ यामुळे नितीशकुमार अनेक महिन्यांपासून नाराज होते. अखेर आता जदयु-भाजपमधील अंतर्गत धुसफूस उफाळून वर आली आहे. नाराजीतूनच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनेक दिवसांपासून भाजपच्या कार्यक्रम आणि बैठकांकडे पाठ फिरवली. त्यानंतर त्यांनी आता भाजपला बिहारच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी ‘आरपार’ची राजकीय लढाई सुरू केली आहे. त्यांच्या या भूमिकेला पक्षातून पाठिंबा मिळाला आहे. आमचे नेते नितीश कुमार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया जदयुचे खासदार रामप्रीत मंडल यांनी सोमवारी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. बिहारच्या राजकारणात सगळं काही शक्य आहे. हा टर्निंग पॉईंट आहे, असे ते म्हणाले.

…तर 160चे संख्याबळ

बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी सर्वाधिक 80 आमदार तेजस्वी यादव यांच्या राजदचे आहेत. भाजपचे 77, जदयुचे 45,काँग्रेस 19, डावेपक्ष 16, अपक्ष व इतर 6 असे संख्याबळ आहे. जदयु, राजद, काँग्रेस आणि डावेपक्षांची महाआघाडी झाल्यास नितीश कुमारांकडे तब्बल 160 आमदारांचे संख्याबळ असणार आहे.

राजदनेही बोलावली बैठक; जदयुसोबत युतीला तयार

नवे सरकार स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जर महाआघाडीचा प्रस्ताव मांडला तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे राजदचे राष्ट्रीय प्रवत्ते शिवानंद तिवारी यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी व दंगेखोरांचे सरकार रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने पक्षाचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी मंगळवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

नितीश कुमारांची सोनिया गांधींशी दूरध्वनीवरून चर्चा

नितीशकुमार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. याचदरम्यान बिहार काँग्रेसचे प्रभारी पाटण्यात दाखल झाले आहेत, तर काँग्रेसने मंगळवारी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे पुढील 48 तासांतच सत्ताबदलाच्या दिशेने मोठी रणनीती आखली जाण्याची चिन्हे आहेत.