पास करण्यासाठी उत्तरपत्रिकेत टाकली 500 ची नोट, बोर्डाने एक वर्षासाठी घातली बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षेत पास होण्यासाठी उत्तर पत्रिकेत 500 रुपये टाकून पेपर तपासणाऱ्याला लाच देणे एका विद्यार्थ्याला चांगलेच भोवले आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत 500 रुपयांची नोट स्टेपल केली होती. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या बदल्यात त्याने परीक्षकाला हे आमिष दाखवले.

उत्तरपत्रिकेसोबत 500 रुपये टाकल्यास आपले काम सोपे होईल, असे त्याला वाटले होते. पण याचा त्याला फटका बसला आहे. विद्यार्थ्याच्या या कृत्यामुळे त्याला पुढील एक वर्षासाठी बोर्डाच्या परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच त्याला या परीक्षेत नापास देखील करण्यात आले आहे.

अहमदाबादमधील बारावीच्या विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेतील कामगिरीबद्दल खात्री नव्हती. त्यामुळेच त्याने कृपया मला पास करा अशी विनंती करत 500 रुपयांची नोट उत्तरपत्रिकेसोबत टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र या विद्यार्थ्याने शिक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न केला नसता तर कदाचित तो ग्रेस मार्क्सने पास झाला असता असे सूत्रांचे म्हणणे आहे.