
>> दिलीप जोशी
उद्या आपला स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. गेली पंचाहत्तर वर्षे आपण अनुभवत असलेल्या स्वातंत्र्याचं ‘अमृत’ लाभण्यासाठी असंख्य स्वातंत्र्ययोद्धय़ांनी आपलं तन-मन-धन पणाला लावून निकराचा लढा दिला. सशस्त्र क्रांतिकारकांपासून अहिंसक असहकार आंदोलनापर्यंत अनेक मार्गांनी स्वातंत्र्यसैनिक लढले. स्वातंत्र्यसंग्रामात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता लढले त्यांच्याविषयी कवी यशवंत यांनी म्हटलंय ‘देश ज्यांचा देव त्यांचे, राष्ट्र ज्यांचा धर्म हो, दास्यमुक्ती ध्येय हो, आप्तविस्तारात ज्यांच्या देशही सामावती; गाऊ त्यांना आरती.’
1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व काळाच्या ओघात जहाल विचारांच्या लोकमान्य टिळकांकडे आल्यावर त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली. लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय यांना पाहिलेले, त्यांची भाषणं ऐकलेले बाबूराव भाटवडेकर यांची योगायोगाने भेट झाली ती 1985 मध्ये. त्यावेळी बाबूराव अर्थातच वृद्ध होते. पण त्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याशी झालेले संवाद आणि राजगुरूंच्या मातोश्री पार्वतीबाई यांना घेऊन भाटवडेकरांच्या पत्नी यमुताई लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये राजगुरूंना भेटायला जात असत याविषयी सविस्तरपणे सांगितलं. 1927 मध्ये बाबूराव रेल्वेतील नोकरीमुळे लाहोरला गेले, तेव्हा अर्थातच हिंदुस्थान अखंड होता. याच लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तीन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आलं. त्यांच्या बलिदानाने देशात संतापाची तीक्र लाट उसळली. जनरल डायरने जालियनवाला बाग येथे बेछूट गोळीबार करून अनेक निरपराध नागरिकांचा बळी घेतल्याचा संताप पंजाबच्या घराघरात होता. भगतसिंग त्यावेळी लहान होते, पण ‘सायमन कमिशन’ विरुद्धच्या भव्य मोर्चाचं नेतृत्व करणाऱया लाला लजपतराय यांच्यावरही ब्रिटिश पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला आणि त्यामुळेच नंतर लालाजींचा अंत झाला. ही घटना घडली त्यावेळी भगतसिंगसारख्या तरुणांना जाचक, जुलमी ब्रिटिश सत्तेचा तिरस्कार वाटू लागला. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून क्रांतिकारकांनी सॅण्डहर्स्ट या ब्रिटिश अधिकाऱयाची हत्या केली. पुढचं बाबूरावांच्याच शब्दांत…
‘‘…आणि मग धरपकड सुरू झाली. क्रांतिकारक भगवतीचरणच्या घरातच आम्ही राहत होतो. त्यांची ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ची पत्रकं निघत. त्यावर कोठे छापले या जागी Erehwon असं असायचं ते उलट वाचलं तर ‘Nowhere’ असं होतं. क्रांतिकारकांच्या गुप्त कारवायांच तो भाग होता. देशभरातील अटकसत्रात आपल्या महाराष्ट्रातला राजगुरू पकडला गेला. त्याला बाबू म्हणत. हे तिघे क्रांतिकारक अगदी तरुण होते. आपल्या तुरुंगातल्या मुलाला भेटायला राजगुरूंच्या मातोश्री एकटय़ाच लाहोरला आल्या. आम्हीही त्यांना आई म्हणायचो. त्या आमच्याकडे राहत होत्या. माझी पत्नी यमुताई भाटवडेकर आणि आई मुलाला भेटायला जेलमध्ये जात असत. काही वेळा मीसुद्धा जात असे. राजगुरूंनी भावाला लिहिलेल्या मोडीमधल्या पत्रात ‘कालच बाबूराव आई मला भेटून गेले’ असा उल्लेख आहे.
फाशी झाली तेव्हा हे तिन्ही क्रांतिकारक अवघे 23 वर्षांचे होते! या क्रांतिकारकांवर खटला चालवण्याचं नाटक ब्रिटिशांनी केलं. पण त्यांना फाशी होणार याची कल्पना त्यांच्यासह सर्वांनाच आली होती. 23 मार्चच्या संध्याकाळी मी रजा घेऊन आई व यमुताईंसह बाबूला भेटायला तुरुंगात गेलो. तिथे भगतसिंगचे आईवडील तसंच आजी-आजोबाही आले होते. जेलबाहेर हजारो लोक जमले होते. जेल अधिकाऱयांनी ‘कैद्यांच्या आई-वडिलांशिवाय कुणालाही त्यांची भेट होणार नाही, असं सांगताच संतापलेल्या विद्यावती देवींनी ‘मग आम्ही कोणीच जाणार नाही, असा पवित्रा घेतला. इंग्रजांनी सर्व संकेत धुळीला मिळवून संध्याकाळच्या वेळी या क्रांतिकारकांना फाशी देऊ त्यांचा अंत्यविधीही परस्पर उरकला. दुसऱया दिवशी संतप्त आणि शोकाकुल जनसागराने या क्रांतिकरकांच्या रक्षा-कलशांची विराट मिरवणूक काढली. क्रांतिकारकांचे निकटवर्तीय म्हणून एका टेबलावर आम्हाला उभं करून लोकांनी आमचाही जयजयकार केला.’’
हे सारं ऐकताना आम्ही रोमांचित झालो होतो. बाबूरावांचे डोळे भरून आले होते. अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आणि त्यांच्या स्फूर्तीदायक तेजस्वी स्मृतीला वंदन करण्याचा असा दिवस. अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची नोंदही नसेल. ‘… परि जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती. तेथे कर माझे जुळती’ असं कुसुमाग्रज म्हणतात. आपणही त्यांचं कृतज्ञतेने स्मरण करूया.
‘एकदा भाटवडेकरांचा लहान मुलगा त्यांच्या कडेवर वाहून भगतसिंग म्हणाले होते, ‘आम्ही तर जाणार… पण देशाची ही पुढची पिढी आहे. त्यांना जपा!’
धन्य ते क्रांतिकारक आणि त्यांची अमर अमृतवाणी!



























































