
>> आसावरी जोशी
७५ वर्षांचे झाले आहे आपल्या देशाचे स्वातंत्र्य.. सोपे कधीच नव्हते ते.. असलेच तर .. नव्हे ते खरोखरच रक्तरंजित होते.. स्वातंत्र्यलढ्यात निरपेक्ष देशभक्तीने झपाटलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र रक्ताचा मळवट भरलेले.. अभिमानाने मिरवते आहे तो मळवट आपली स्वातंत्र्यदेवता.. छत्रपती शिवरायांनी आपल्या रक्ताच्या धारेने स्वातंत्र्यदेवीचा मळवट सर्वप्रथम भरला.. आणि ती रक्ताची धार तिने आजतागायत शिरी धारण केली आहे. या प्रेरणेतून १६ व्या शतकात सुरु झालेला हा स्वराज्याचा प्रवास १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत खडकाळ वाटचाल करीत स्थिरावला. स्थिरावला नाहीच.. त्यानंतरही फाळणीच्या जखमा उरी बाळगत आपली स्वातंत्र्यदेवता हातात तिरंगा मिरवत साऱ्या शहिदांना पोटाशी घेऊन स्वराज्य मिरवते आहे..
स्वराज्य.. या तीन अक्षरांतून छत्रपती शिवरायांनी आपल्यापैकी प्रत्येकाला स्वत्वाची.. स्वाभिमानाची.. “स्व” ची जाणीव करून दिली आणि सातत्याने आंतरवन्ही धगधगत राहिला.. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार त्यात समिधा अर्पण केल्या. आणि स्वाभिमानाचा तिरंगा नेहमीच नभात फडकत राहिला.. मिरवत राहिला.. आपल्या सुपुत्रांचे.. शहिदांचे रक्तरंजित बलिदान!!
अनेक देशांचे स्वांतत्र्यसंग्राम वाचनात आले. पण आपल्या स्वातंत्र्यलढ्याला अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बलिदानाची आहुती आहे. घरातील चुलीवर दोन वेळ काहीतरी शिजायची भ्रांत असतानाही देशप्रेमाची आग सतत दीप्तीमान राहिली. पोटातल्या भुकेला स्वराज्याच्या जाणीवेने नेहमीच मात दिली आणि आज हे ७५ वर्षांचे स्वातंत्र्य आपली पिढी, पुढची पिढी उपभोगते आहे.. उपभोगणार आहे. आज हे लिखाण करत असताना राष्ट्रध्वज उभारण्याचे अनेक नियम समोर आले.. आणि हे कठोर नियम का लावले असतील हेही सहजच लक्षात आले.. आज अमेरिकेचा ध्वज कोणीही कसाही परिधान करते.. अगदी पादत्राणावरही मी तो पहिला आहे. आणि तेथील लोकांना फारसे त्या गोष्टीचे नवलही नव्हते.. यातून एक गोष्ट पुन्हा एकदा समजली कि जेव्हा एखादी गोष्ट विनासायास मिळते तेव्हा त्याची फारशी किंमत राहत नाही. पण आपले स्वातंत्र्य विनासायास तर नव्हतेच उलट ते उभे आहे अत्यंत त्यागाच्या.. बलिदानाच्या रक्तरंजित पायावर.. जखमांवर.. देशप्रेमात आमची किंवा आमच्या पुढची पिढी अजिबात मागे नाही याची मला पक्की खात्री आहे.. फक्त गरज आहे या भक्तीला, प्रेमाला थोड्या आत्माचिंतनाची जोड देण्याची. देशभक्ती किंवा देशप्रेम म्हणजे काय.. त्या त्या कालानुरूप, परिस्थितीनुरूप याचे स्वरूप बदलते. फक्त ते आपण लक्षात घेतले पाहिजे.
अगदी साधे सोपे नागरिक शास्त्रातील नियम जरी आपण पाळले तरी आपले देशप्रेम निस्वार्थ भावनेने झळाळून उठेल. उदाहरणार्थ.. रस्त्यावर वाहन चालविताना वाहतुकीचे सोपे नियम पाळणे, विनाकारण वाया जाणाऱ्या उर्जेची, पाण्याची बचत करणे, जरुरी पुरतेच अन्न शिजवणे, ते वाया जावू न देणे, निसर्गाची, पर्यावरणाची जपणूक करणे, निष्पाप प्राण्यांना त्रास न देणे, प्लास्टिकचा वापर थांबविणे, निसर्ग, समुद्र येथील प्रदूषण थांबविणे. आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणे, पुरुषांनी परस्त्रीचा आदर आणि सन्मान राखणे. ही यादी खूपच लांबत जाईल. पण आपण किमान या गोष्टीचे जरी पालन केले तरी स्वराज्य आणि सुराज्य आपली स्वातंत्र्यदेवता दोन्ही अभिमानाने मिरवेल!!


























































