चुकीची माहिती देणाऱ्या शिक्षकांची वेतनवाढ रोखणार, ग्रामविकास विभागाचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदली करू पाहणाऱया शिक्षकांनी त्यासाठी आवश्यक ती माहिती ऑनलाइन सादर केली आहे. तथापि, काही शिक्षकांनी चुकीची माहिती सादर केली असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी संबंधित शिक्षकांच्या माहितीची पडताळणी करून चुकीची माहिती सादर करणाऱया शिक्षकांची वेतनवाढ थांबविण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित शिक्षकांना बदलीप्रक्रियेत सहभागी होण्याची संधीदेखील हुकणार आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या 2022मधील बदल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही सुरू आहे. या धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाहीबाबत बदलीस पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग-1 व भाग-2मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ठरविण्यात आलेले धोरण व त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून, या धोरणातील तरतुदींप्रमाणे ऑनलाइन प्रणालीमार्फत अर्ज सादर करण्यासंदर्भात शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ‘ना हरकत प्रमाणपत्र’धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग-1मधील शिक्षक यांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलेल्या अशा शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्णतः खरी व वस्तुस्थितीदर्शक माहिती भरून अर्ज करणे अपेक्षित आहे. खरी माहिती भरण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने अशा जबाबदार व्यक्तींकडून अर्ज भरताना जाणीवपूर्वक चुकीची व खोटी प्रमाणपत्रे, कागदपत्रे, माहिती सादर केली जाणे अपेक्षित नाही. तथापि, काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोटय़ा व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आहेत, अशा तक्रारी शासनाला प्राप्त झालेल्या आहेत.

अशा खोटय़ा व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरल्यास अशा स्वरूपाच्या तक्रारींची विहित वेळेत चौकशी करून संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटय़ा व चुकीच्या प्रमाणपत्राआधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल, त्यांचे अर्ज ऑनलाइन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावेत. संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्यात यावी. मात्र, बदल्यांसंदर्भात ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा असणार नाही.