
>> शिरीष कणेकर
चला, टीव्हीवरच्या मराठी मालिकांची वेळ झाली. मोबाईल फडताळात लपवून ठेवा. दारावरची बेल ऑफ करा. चुलीवरचा भात करपून खाक होऊ द्या. गॅसवरचं दूध फसफसून ऊतू जाऊ द्या. आजीचं तोंड तिच्याच आंबाडय़ानं बांधून ठेवा. आजोबांना खुंटीला लटकत ठेवा. पाळण्यातल्या गोटय़ाच्या तोंडी बोंडी द्यायला सापडली नाही तर बोळा कोंबा. ‘टायगर’च्या मुसक्या आवळा. नवऱयाला बाटली देऊन त्याचं तोंड बंद करा. आता झाली योग्य वातावरण निर्मिती. स्टार्ट ‘राजा रानीची ग जोडी’!
अर्क खलनायक दादासाहेब अधूनमधून सतत कोणा ‘बाबुजी’च्या नावानं टाहो फोडत असतो. मालिका संपताना (संपेल ना हो या शतकात?) हे बाबुजी एकदा दाखवाच. ते बाबू जगजीवनराम किंवा बाबुजी सुधीर फडके नसतील ना? ही मालिका आपला गुणी चिन्मय मांडलेकर लिहितोय. पोटासाठी काय काय करावं लागतं बघा. त्याच्या नायकाला पोलीस युनिफॉर्म घालण्याचे व डोळे मोठे करून बघण्याचे पैसे मिळत असावेत आणि नायिकेला लाजून ‘जावा तुम्ही तुकडे’ म्हणण्याचे. मला भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर गुलाबचे कॅरेक्टर भावले. कोणीही दुष्कृत्य करीत असला तर त्याची मनोभावे मदत करायची हे तिच्या जीवनाचे सूत्र दिसते.
विविध वाहिन्यांवरच्या भंगार मालिका डोळय़ात प्राण आणून पाहणे हा घरोघरी स्त्री -पुरुषांनी एकमतानं एकत्रित करायचा एकमेव पवित्र कार्यक्रम उरलाय. स्वतःच्या जीवनातले स्वारस्य संपलेली आपल्यासारखी माणसं मालिकेतील पात्रांचं आयुष्य जगू पाहतात. ‘भाग्य दिले तू मला’मध्ये कावेरी व वैदेही या गंगेसारख्या पवित्र मैत्रिणी त्यांचा छोटा फ्लॅट राजवर्धनबरोबर ‘शेअर’ करतात. दोन देखण्या युवती व एक उंचापुरा देखणा युवक सख्खी भावंडं असल्यागत एकत्र राहतायत ही कल्पना या आसारामबापूंच्या देशात अजून तरी प्रत्यक्षात आलेली नाही. मालिकावाले काळाच्या पुढे आहेत असं म्हणायचं का? कदाचित नवीन पिढीला ते सन्मार्ग दाखवत असतील. आसारामबापूंनी तर मोक्ष गाठण्यासाठी आश्रमात भुयार खणलं होतं.
मी फक्त ‘कलर्स’वरच्या ‘ढकलिका’ बघतो. कारण एक वाईट मालिका सोडून दुसऱया वाहिनीवरची तशीच वाईट मालिका बघण्याला काय अर्थ आहे? विसंगती बघण्यात सुसंगती नको का? सगळय़ा मालिकांतील समान गोष्ट म्हणजे कोणी न कोणी प्रत्येक एपिसोडमध्ये ‘फ्रेश’ होऊन येत असतं. हे लोण नक्की कुठून आलंय? नशीब ‘महाराणी ताराबाई’ फ्रेश होऊन येते म्हणत नाही. इतकं ‘फ्रेश’ होऊनही पात्रे कळकटच का दिसतात? (‘जीव माझा गुंतला’मधल्या एकटय़ा दाढीवाल्या प्रशांतसरांबद्दल मी बोलत नाहीय.)
ही माणसं आपल्याला सतत प्रतिक्रिया नोंदवणारे कुणाचे न कोणाचे ‘क्लोजअप्स’ दाखतात. ते फक्त आपल्यासाठी असतात. इतर पात्रांनी हे बघितले तर सगळं बिंग फुटणार नाही का? शिवाय या ‘क्लोजअप्स’मुळे बहुमोल वेळ खाता येतो. चलने दो, घाई काय आहे?
‘सोनी’वरच्या ‘सुंदर आमचं घर’ या अचाट मालिकेत रितेश प्रथमेशला म्हणतो, ‘ही फाइल तू ओव्हरलुक कर.’ त्याला ‘लुकओव्हर’ म्हणायचं असतं. ‘ओव्हरलुक’ म्हणजे दुर्लक्ष करणे. सेटवरच्या कोणालाच बेसिक इंग्रजी येत नाही? काय गं सुकन्या? संजय मोनेला सांगू का?
त्यांना पात्रांचे स्वभाव आमूलाग्र बदलायचे असतात तेव्हा जादूची कांडी फिरल्यासारखे ते बदलतात. उदाहरणार्थ ‘राजा रानीची ग जोडी’मधली ‘हडल’ राजश्री संतीण राजश्री होते. याउलट ‘सुंदर माझं घर’मधली जाऊबाई-खोटाबाई प्रतिमा जीव गेला तरी नीचपणाचं क्रत सोडत नाही. ‘जीव माझा गुंतला’मधला मल्हार अंतराला सतत पाण्यात बघतो, सतत टाकून बोलतो. मग एका रात्री निर्माता, दिग्दर्शक व लेखक त्याच्या कानात फुसफुसतात व सकाळी उठल्यापासून त्याला अंतराविषयी ममत्व वाटायला लागतं. असं का हे वाटलं तर विचारा तुमच्या टीव्हीच्या खोक्याला.
मोबाइलच्या ‘यू टय़ूब’ (आणखी एक भंकस यंत्रणा) वर ऐकल्यासारखं वाटतंय की, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत पुढे जाऊन गेलेली व भिंतीवरच्या फोटोत विसावलेली आई (पक्षीः आतीशा नाईक) पुन्हा प्रकटते म्हणे. ती किनई मेलेलीच नसते, कळतंय का? आता फोटो काढून ठेवावा लागणार. येता-जाता नमस्कार करायची सवय सोडावी लागणार.
‘भाग्य दिले तू मला’मधला राजवर्धन पोरकट व उथळ असतो की विचारी व प्रगल्भ असतो हे ओळखणाऱया प्रेक्षकाला वाहिनीतर्फे पिंपरीची एस.टी.ची निम्म्या खर्चात ट्रीप का देऊ करत नाहीत? बच्चूमामाच्या डोक्याला खरंच काहीतरी लागलंय? हे आम्ही मोटम प्रेक्षकांनी ओळखलंय बरं का!
मी कबूल करतो की, मी ‘बॉस माझी लाडाची’ बघत नाही. कारण त्यातली नायिका मला दिसायला आवडत नाही. आता या वयात (नक्की किती ते राहू द्या) एवढा जोक करायला हरकत नसावी.



























































