
नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. शामराव शंकर बांदल (वय 52, मूळ रा. बिभवी, ता. जावली, सध्या रा. रामकुंड, पुष्प ज्योतिबा अपार्टमेंट, सातारा) असे अटक केलेल्या प्रमुख लिपिकाचे नाव आहे.
नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी प्रमुख लिपिक शामराव बांदल यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने पडताळणी केली असता, तक्रारीत तथ्य आढळले. त्यानंतर विभागाने सातारा येथील नगर भूमापन कार्यालयात सापळा लावला असता, शामराव बांदल हे तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना अलगद जाळ्यात अडकले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक काटकर, पोलीस कॉन्स्टेबल येवले, भोसले यांनी सहभाग घेतला.
































































