गणेशाला प्रिय नैवेद्य   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विघ्नहर्त्याचे आगमन झाले. धुपाचा सुगंध सर्वत्र घरात दरवळतोय. आरतीचे स्वर निनादताहेत. रात्री टाळ-मृदुंगाच्या साथीने भजनं घराघरांत होताना दिसताहेत. वातावरण अगदी भक्तिमय झालंय.  गणेशाला मोदक आवडतात. उकडीचे मोदक तर त्यांच्या आवडीचे. या कालावधीत घराघरांत उकडीचे मोदक बनतात. तीसुद्धा बनविण्याची एक कला आहे. साच्यावर कुणीही मोदक बनवील, पण हातानं ते करताना स्त्र्ायांची कसोटी लागते. आमच्या व्यावसायिक नाटय़ आणि मालिका क्षेत्रात काही जणींचा मोदक बनविण्यात हातखंडा आहे. शर्मिष्ठा राऊत, शुभा गोडबोले आणि प्रिया मराठे ही नावं प्रामुख्याने समोर आली. वैभव मांगलेसुद्धा मोदक बनवितो. त्यांच्याशी संजय कुळकर्णी यांनी केलेली बातचीत.

उकडीचे मोदक आणि गणपती उत्सव हे एक अद्वितीय कॉम्बिनेशन आहे. उकडीचे मोदक हा कोकणातील ठेवा आहे. तांदूळ कोकणात पिकतो. तांदळाची उकड काढून खोबरं-गूळ आणि थोडीशी वेलची असं त्याचं सारण करून वाफवलं की उकडीचे मोदक तयार. त्यावर तुपाची धार सोडली तर अहाहा. जगामध्ये गोड पदार्थात मिठाई नव्हे उकडीच्या मोदकाचा वरचा नंबर लागेल.

माझ्या लहानपणीच मी उकडीचे मोदक करायला शिकलो. त्याची उकड कशी काढायची, सारण कसं भरायचं हे आमची आजी आणि आई करताना पाहिलं. ते पाहता पाहता हात आपोआप मोदकाच्या पाकळ्या करण्यात वळू लागले. आमच्या रत्नागिरीतील कोलवंडळा गावी लहानपणी आम्ही चुलत भावंडं मिळून 45 जण जमत असू. प्रत्येकाला 4 असे 200 च्या आसपास मोदक आजीबरोबर आम्ही भावंडं करीत असू. आमची चुलत आजी 95 वर्षांची असूनही ती अजूनही सुरेख मोदक बनविते. आई तर उत्तमच करते.  माझ्यासारखे उकडीचे मोदक कुणीही बनवू शकत नाही असे माझे मित्रवर्ग सांगतात तेव्हा कॉलर टाईट होते.

– वैभव मांगले

गणेशाचे आगमन झाले की त्या दिवशी उकडीचे मोदक बनविणे आलंच. मोदक सुरेख कसा होईल याकडे लक्ष असतंच. मोदक 21 तयार झाले की ताटात घेऊन त्याचा नेवैद्य गणरायाला दाखवायचा. डोळे बंद करून त्याची आराधना करताना नेहमी एकच इच्छा असायची ती ही की, एका क्षणासाठी तरी मूर्ती सजीव व्हावी आणि पटकन एकतरी मोदक गणेशाने खावा. एका वर्षी तर मोदक फसले. त्याची आठवण प्रत्येक गणपती उत्सवात येतेच. त्या वेळेपासून मोदक करताना नेहमीच टेन्शन हे येते.

– शुभा गोडबोले

मोदक बनविताना श्रद्धा असते, प्रेम असतं. गणेशासाठी मोदक बनवतो, याबद्दलची भावना मनात वेगळीच असते. मोदक बनविण्यात माझा हातखंडा आहे. मोदकाबरोबर मी पाटोळी जी हळदीच्या पानावर बनवितात तीही बनविते. मोदकाचेच सारण त्यात असतं. गणेशाच्या भक्तीमुळे ते सहज जमतं.

– शर्मिष्ठा राऊत

मोदक बनविण्याचा जो आनंद आहे तो वर्णनापलीकडचा आहे. मी आणि आई उकडीच्या मोदकाच्या ऑर्डर घ्यायचो. आता नाही घेत. कारण शूटिंगमुळे वेळच नाही. बाप्पासाठी मोदक बनविणे यात भक्तीची भावना असते. माझी पणजी 108 मोदकांचे वाण तयार ठेवायची. त्याच्या प्रत्येक मोदकाच्या 11 पाकळय़ा असायच्या. त्या करताना मी पाहत आलेय. मला स्वयंपाकाची  आवड असल्यामुळे आईकडून शिकले. आमच्याकडे कुणालाही साच्यातले मोदक आवडत नाहीत. आता दोन दिवस सुट्टी मिळाल्यामुळे उकडीचे मोदक बनविण्यास उसंत मिळाली आहे. आता पुन्हा सेटवर जाऊ तेव्हा 21 मोदक घेऊन जाणार आहे. संजनाला स्वयंपाक येत नाही, पण रूपालीला येतो. आता आमच्या मालिकेतील माझी सासू जसं सांगेल तसं मी आणि अनघा मोदक करू. काwतुक तर देशमुख्यांच्या घरी होईलच.

– रुपाली भोसले