नाद- मराठी – बोले रे पपीहरा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

1971 च्या आरंभी हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला एक नितांतसुंदर चित्रपट हिंदी पडदा गाजवू लागला. शालेय वयातल्या एका मुलीचं एका अभिनेत्यावर असलेलं एकतर्फी ‘प्रेम’ आणि नंतर तिला होणारा वास्तवाचा उलगडा एवढीच कथावस्तू. पण गुंफण इतकी अप्रतिम जमली की ‘गुड्डी’ घराघरात पोहोचली. त्यातला जया भादुरीचा खटय़ाळ आणि भाबडय़ा शाळकरी मुलीचा अभिनय जितका गाजला, तितकंच गाजलं वाणी जयराम यांच्या स्वरातलं आणि वसंत देसाई यांनी संगीत दिलेलं गुलजार यांचं ‘बोले रे पपीहरा, नित मन प्यासा, नित मन तरसे।़।़रे’ हे गाणं. तोपर्यंत हिंदी संगीतप्रेमींना परिचित नसलेला एक वेगळाच स्वर लेऊन हे गाणं आलं होतं. वसंत देसाईंचं संगीत म्हटल्यावर ते सुश्राव्य असणारच होतं. पण वाणी जयराम या मुख्यत्वे दाक्षिणात्य चित्रपट जगतात प्रसिद्ध असलेल्या गायिकेने आपल्या स्वरांनी जादूच केली. ‘ही कोण नवी गायिका?’ अशी चर्चा सिनेगीत रसिकांमध्ये होऊ लागली. आज 51 वर्षे उलटली तरी वाणी जयरामचं हे गाणं तितकंच ताजं आहे. किंबहुना वाणी जयराम म्हटलं की रसिकांना एकच गाणं आठवतं ते हेच. तसं त्याच चित्रपटातलं शालेय प्रार्थना म्हणून दिसणारं ‘हमको मन की शक्ती देना मन विजय करे’ हे गाणं. त्यातली शिक्षिका आणि जयाचा अभिनय सगळंच पुन्हा पहावं असं. केदार रागातलं हे एक अप्रतीम गीत वाणी जयराम यांचंच.

30 नोव्हेंबर 1945 रोजी कलैवाणीचा जन्म तामीळनाडूतील वेल्वोर येथे झाला. तिचा गळा गोड आहे हे लक्षात येताच आई पद्मावती यांनी तिला रंगा रामानुज अय्यंगार यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी पाठवलं. वयाच्या आठव्या वर्षीच वाणीने रेडिओवर गीत सादर करण्यापर्यंत प्रगती केली. त्याच काळात रेडिओ सिलोनवर (श्रीलंका) लागणारी हिंदी गाणी ऐकण्याची आवड निर्माण झालेल्या वाणीने ती गाणी गुणगुणायला सुरुवात केली. परंतु कारकीर्दीच्या सुरुवातीला मुख्यत्वे तमीळ गाणीच मिळत गेली. 1969 मध्ये जयराम यांच्याशी विवाह झाल्यावर वाणी मुंबई नावाच्या उत्कर्षनगरीत आल्या. जयराम यांनी त्यांना हिंदुस्थानी संगीत शिकायला प्रोत्साहन दिलं. (दाक्षिणात्य संगीताला कर्नाटक संगीत म्हटलं जातं.) त्यामुळे पतियाळा घराण्याचे उस्ताद अब्दुल रहमान खां यांच्याकडे त्यांनी रीतसर तालीम घेतली. त्या ठुमरी, गझल आणि हिंदी भजनं गाऊ लागल्या. ती गाणी ऐकून संगीतकार वसंत देसाईंनी त्यांना ‘गुड्डी’ सिनेमातली गाणी दिली आणि पुढचा इतिहास सर्वांना ठाऊकच आहे. वाणी जयराम यांच्या स्वरांनी नटलेला दुसरा हिंदी चित्रपट म्हणजे ‘मीरा.’ संत मीराबाईंच्या जीवनावरच्या चित्रपटाचे संगीत, विख्यात सतारवादक पंडित रवीशंकर यांचं होतं. त्यातली गोड गाणी गाजली आणि रसिकमनात सर्वाधिक गुंजलं ते ‘मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरो ना कोई’ हे गीत.

देशातल्या अनेक भाषांमध्ये हजारो गीतं गाणाऱ्या वाणी जयराम यांच्या कारकीर्दीच्या बहराच्या काळात त्यांना गानक्षेत्रातील विविध राज्य आणि राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. वसंत देसाई यांनी या स्वराला मराठीतही आणलं. मराठीतलं त्यांचं चटकन आठवणारं गाणं म्हणजे ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी बाळ कोल्हटकर यांचं, त्यांच्याच ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकातलं हे गाणं अमर केलं. काही मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी म्हटली. आकाशवाणी वाद्यवृंदातही वसंत देसाईंच्या संगीतातलं, साने गुरुजींचं प्रसिद्ध ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनि राहो’ हे गीतही प्रभाकर यांच्यासह गायिलं. (हेच गीत सुधीर फडके यांनीही स्वरबद्ध केलेलं आहे.)

याशिवाय ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ हे जगदीश खेबुडकरांचं आणि राम कदम यांचं संगीत असलेलं गाणं तुम्ही ऐकलं असेल. त्याहीपेक्षा आकाशवाणी वाद्यवृंदासाठी वसंत देसाईंच्या संगीतातलं ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’ हे गाणं आठवत असेल. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं. ‘प्रियतम दर्शन देई’ या गीताचे शब्द वसंत निनावे यांचे तर संगीत दशरथ पुजारी यांचे हे भावगीत आहे. असेच एक भावगीत शांताराम नांदगावकरांचं. ‘दूर जाते ही वाट, अरे कान्हा मला जाऊ दे घरी’ या ठसकेबाज गाण्याचं संगीत दशरथ पुजारी यांचं आहे. वसंत देसाईंच्याच संगीतात, संत नामदेव यांचा अभंग वाणी जयराम यांनी गायिला ‘सुखाचे हे सुख श्रीहरि मुख.’ अशा मराठी गाण्यांमधून वाणी जयराम परिचित झाल्या. या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून 1972 मध्ये त्यांना ‘तानसेन’ ऍवॉर्ड मिळालं, तर 2012 मध्ये त्यांचा ‘लाइफटाइम ऍचिव्हमेंट’साठी गौरव करण्यात आला. 2017 मध्ये न्यूयॉर्क येथेही त्यांच्या स्वरसिद्धीची दखल घेतली गेली आणि ‘बेस्ट फिमेल सिंगर ऍवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

मोजक्याच गाण्यांमधून हिंदी, मराठी गानरसिकांवर आपल्या आवाजाचा ठसा उमटवणाऱ्या वाणी जयराम यांची ‘बोले रे पपीहरा’ आणि ‘ऋणानुबंधाच्या’ ही गाणी तरुण पिढीही गाते. विशेष म्हणजे ‘ऋणानुबंधाच्या’ हे गाणं गाणारे कुमार गंधर्व जन्माने कानडी तर वाणी तामीळ भाषिक… पण सूर वैश्विक असतात हेच खरं!