परीक्षण – परंपरेला छेद देणाऱ्या कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रवींद्र दा. लाखे

प्रियांका पाटील यांच्या ‘इब्रु‘या पहिल्याच कथासंग्रहातल्या बहुतेक साऱया कथा स्त्र्ााrप्रधान आहेत. परंतु यात लेस्बिअन-गे-तृतीयपंथी अशाही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहेत. यातल्या पहिल्या ‘इब्रु’ या कथेमध्ये कावेरी आणि चन्नवा यांच्यातील लेस्बिअन नातेसंबंध हा विषय लेखिकेने सक्षमतेने हाताळला आहे. कथावस्तूच्या आशयाची पोच आणि खोली गाठणे जरी कठीण गोष्ट असली तरी रसाळ आणि वाचनीय शैलीमुळे वाचक ही कथा वाचत जातो. लग्न झालेली कावेरी तिच्यातल्या पुरुषामुळे पहिल्या रात्री नवऱयाला अंगाला हात लावू देत नाही. सासरचे लोक तिला माहेरी आणून सोडतात, पुढे काय होते या तिढय़ावर ही कथा आधारलेली आहे. ‘त्याच्यातली ती’ ही कथा रेल्वेप्रवासामध्ये भेटलेल्या हिजडय़ावरती आहे. अत्यंत भावूक आणि हळव्या शैलीतली ही कथा तिच्या कथावस्तूमुळे आवडून जाते. ‘रणमर्दिनी’ या कथेत चांगले नाटय़ आहे. आणि या कथेचा शेवट कथेला एका वेगळ्या उंचीवर नेणारा आहे. समाजाच्या बुळबुळीत परंपरांना जोरदार चपराक देणाऱया नायिकेचा जीवनप्रवास स्तब्ध करणारा आहे. ‘डेस्टिनेशन’ या कथेत विवाहबाह्य संबंध हा विषय लेखिकेने हाताळला आहे. आरोहीच्या आयुष्यात नवऱयाच्या विवाहबाह्य संबंधाने झालेली उलथापालथ, त्यानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या वरुणने आरोहीला आयुष्यभराची साथ देण्याचे नाकारणे, स्वतःच्या संसाराला अधिक महत्त्व देणे अशी वळणे ही कथा घेत जाते. आपल्या दोन मुलींबरोबर आरोहीने गाठलेले शेवटचे डेस्टिनेशन मन अस्वस्थ करते.

या संग्रहातली अतिशय आगळी कथा म्हणजे ‘मोक्ष’, अत्यंत साधीसुधी पण गंमतीशीर. प्रियकराला राजरोस भेटता यावे म्हणून अंगात भूत शिरल्याचे नाटक करून नायिका स्मशानात जात प्रियकराला भेटत राहते. कथेचा शेवट अप्रत्यक्षपणे मोठा संदेश देऊन जातो. या कथेत लेखिकेने नाटय़मय शैलीचा पुरेपूर वापर केला आहे. ‘सीक्रेट बॉक्स’ ही कथा सागर, आकाश आणि रावी या त्रिकुटाची असून नव्या पिढीतील मुलांचे प्रेम, लग्न या विषयांच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारी आहे. ‘रांजण’ या कथेत केंद्रस्थानी असणारी जानकी आपल्यात उफाळून येणारी वासना आंघोळ करून शमवायची. त्यासाठी ती घरी एक मोठा मातीचा रांजण आणते. रांजण हे प्रतीक लेखिकेने पुरुषासाठी योजले आहे. ग्रामीण शैलीत असलेली ही एक उत्तम कथा आहे. तारुण्यात वैधव्य आलेल्या ग्रामीण स्त्र्ााrचे भावविश्व इथे अतिशय सुंदर व्यक्त होते. या कथेचा शेवट निःशब्द आणि अस्वस्थ करून टाकतो. रांजण रूपक म्हणून यापूर्वी असे कधीही वापरण्यात आले नसावे. ‘निळावंती’ ही कथा निळावंती या गूढ ग्रंथाभोवती फिरणारी असून; आयन रॅन्ड लिखित ‘फाऊंटनहेड’ या जगप्रसिद्ध कादंबरीतल्या हॉवर्ड रोर्क या वास्तुशास्त्र्ाज्ञ नायकाचा यामध्ये उल्लेख आहे. लेखिकेने पक्ष्यांच्या भाषेवरील इंग्रजी, मराठी साहित्याचा केलेला अभ्यास या कथेतून दिसतो. ‘बोगदा’ या कथेत रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱया नायिकेचा एका प्रवासादरम्यान लेखिकेशी झालेला संवाद वास्तवदर्शी वाटतो. या कथेतील बोगद्यामधला लाल रंग आणि रेड लाईटमध्ये असलेल्या लाल रंगाचा संबंध अतिशय समर्पक दर्शवला आहे. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर ब्रेस्ट काढलेल्या समिधाच्या मनातली स्त्र्ााrसुलभ घालमेल अत्यंत प्रत्ययकारकरीत्या व्यक्त करणारी शेवटची कथा म्हणजे ‘ना’स्तन. कॅन्सरमुळे स्तन गमावलेल्या पत्नीची, आईची व्यथा ही कथा चित्रित करते.

‘इब्रु’ हा कन्नड शब्द आहे. या शब्दाचा मराठी अर्थ आहे दोघी. या संग्रहातल्या बहुतांश कथा कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवरच्या गावा-शहरात घडणाऱया आहेत. काही अस्सल ग्रामीण भागातल्या आहेत तर काही परदेशात, उरलेल्या मुंबई महानगरात घडतात . ‘त्याच्यातली ती’ या कथेची निवेदक ट्रेनमधल्या हिजडय़ाशी ओळख वाढवते. आणि त्याला नाव विचारते. तर हिजडा विचारतो, ‘मेरा नाम चाईये या मुझमे छिपा उसका चाईये?’ ती म्हणते ‘आपका’. तर तो हिजडा म्हणतो, ‘देख, पहले मे सूरज था, लेकिन रोशनी कम पड गयी, नतिजा माँ-बाप ने घरसे निकाल दिया, अब आशा हूँ।’ केवळ नाव सांगण्यातून लेखिकेने मोठी अर्थपूर्णता साधली आहे.

‘इब्रु’ मधल्या दहाही कथांची कथावस्तू विलक्षण आहे. आगळ्या व्यक्तिरेखा, त्यांच्या वेदना आणि शैलीचा संयोग यामुळे ही कथा संपल्यावर सुद्धा मनाची घालमेल वाढवत राहते. या संग्रहातल्या सर्वच कथा सुंदर कथाबीजातून साकारल्या गेल्या आहेत. कथावस्तूकडे विषय म्हणून पाहणे फिक्शन घडवू शकत नाही. नुसते वास्तव मांडले म्हणजे फिक्शन निर्माण होत नाही. लेखकाची चिंतनशील कल्पनाशक्ती कथावस्तूचे फिक्शन घडवू शकते. लेखिका वयाने लहान असल्या तरी कथासंग्रहातून त्यांच्यात एक मोठी कथालेखिका होण्याची बीजे दिसतात.

‘इब्रु‘चे मुखपृष्ठ व रेखाचित्रे अन्वर हुसेन यांची असून ती कथासंग्रहाला अतिशय समर्पक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, दिग्दर्शक-निर्माता, लेखक गजेंद्र अहिरे यांनी कथासंग्रहाला दिलेली दाद ही प्रत्येक कथा वाचून झाल्यानंतर समर्पक असल्याची अनुभूती येते. ‘इब्रु’ कथासंग्रह आशादायी; मुख्य म्हणजे वाचनीय आणि विचारप्रवृत्त करणारा आहे. प्रियांका पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

इब्रु

लेखक: प्रियांका पाटील

प्रकाशक: मेनका प्रकाशन

पृष्ठ: 275, मूल्य: रुपये 168/-