उदे गं अंबे उदे! अष्टमीचे सृजनात्मक महालक्ष्मी दर्शन…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राज चिंचणकर

नवरात्रीतील अष्टमी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अष्टमीच्या दिवसाचे वैशिष्टय़ म्हणजे पिठाची देवी! अष्टमीच्या रात्री या देवीचे पूजन करून महालक्ष्मी दर्शन घडवले जाते. महालक्ष्मी दर्शनाचा हा सोहळा विविध ज्ञातींचे वैशिष्टय़ आहे. मात्र, कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजात हा सोहळा अधिकतर पाहायला मिळतो. माटुंगा-माहीमच्या लोकमान्य नगरातही असा सृजन सोहळा गेली 70 वर्षे अखंडित सुरू आहे.

पिठाची देवी म्हणजे, तांदळाच्या पिठाची उकड काढून तयार करण्यात येणारा देवीचा मुखवटा! देवीचा मुखवटा बनवण्याच्या प्रक्रियेला अष्टमीच्या दुपारपासून प्रारंभ होतो. येथील भगिनींकडून, सृजनाचे प्रतीक असलेले हळदी-पुंकू चुलीला वाहून मोठय़ा पातेल्यात आधण ठेवले जाते. त्यात किंचित हळद-पुंकू आणि आंबेमोहर व कोलम तांदळाची पिठी घातली जाते. उकड तयार झाल्यावर देवीचा मुखवटा आणि अंबाडय़ासाठी दोन गुळगुळीत गोलाकार केले जातात. यानंतर सुरू होतो कलात्मक प्रवास!  एका कलाकाराकडून या उकडीतून डोळे, नाक, कान, ओठ निर्माण केले जातात. नंतर रंगकाम सुरू होते. मृदू तपकिरी छटा असलेले डोळे, कपाळावर रेखलेले पुंकू आणि काळाभोर अंबाडा असा देवीचा थाट असतो. त्यानंतर, नाकात पाणीदार मोत्यांची नथ व अंबाडय़ावर भरगच्च वेणी घातली जाते. इतके झाले की आपसूकच तिच्या ठायी वात्सल्य आणि मातृत्व प्रकटते. देवीचा उकडीच्या पिठाचा चेहरा वगळता सर्व भाग पूर्णतः लाकडी असतो. आरती झाल्यावर महालक्ष्मी दर्शन घडवले जाते. विशेष म्हणजे, हा मुखवटा साकारतानाचा सृजन सोहळा सगळय़ांना पाहता येत नाही. साधारण चार तास मुखवटा टिकतो. हळूहळू उकड कोरडी पडत जाते आणि मुखवटय़ाला सुरकुत्या पडत जातात; तेव्हा मुखवटा उतरवण्याची वेळ झाल्याचे सूचित होते. अशी ही गौरवर्णीय महालक्ष्मी भाविकांवर मोहिनी घालते. देवीच्या या सात्त्विक रूपाचे दर्शन घेण्यासाठी केवळ भाविकच नव्हे; तर कलाप्रेमींचीही पावले या महालक्ष्मीकडे वळतात.